

कराड : मूठभरांना पाणी देणारे धोरण बदलून शेतीवर अवलंबून असलेल्या प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळवून देणारी श्रमिक मुक्ती दल ही एकमेव संघटना आहे. पाणी, जंगल, सूर्यप्रकाश, वारा या संसाधनावर श्रमिकांचा अधिकार आहे. त्याचे समन्यायी वाटप झाले नाही तर सरकारला धडा शिकवण्यासाठी सज्ज होऊया, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले. भांबे येथे श्रमिक मुक्ती दलाच्या 30 व्या अधिवेशनात ते बोलत होते.
यावेळी श्रमुदचे राज्यअध्यक्ष, ज्येष्ठ आदिवासी कवी वाहरू सोनवणे, कार्याध्यक्ष कॉ.संपत देसाई, कॉ.जयंत निकम, संतोष गोटल, मेजर सुखदेव बन यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.भारत पाटणकर म्हणाले, धरणग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनासह आपण संघर्ष करून सरकारला नवे कायदे, धोरणे राबविण्यास भाग पाडले. पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी आता आपण संघर्षाला तयार राहूया. लढून मिळविलेल्या गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी आंदोलनाची तयारी करू, असे आवाहन करून महापुरुषांची बदनामी जाणीवपूर्वक केली जात आहे, ती खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला.
वाहरू सोनवणे म्हणाले, कष्ट करणारा श्रमिक,आदिवासी, दलित, स्त्रिया यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठी लढा देणारी संघटना म्हणजे श्रमिक मुक्ती दल आहे. सर्व शोषणापासून मुक्ती हेच आपले ध्येय आहे.
कॉ.संपत देसाई म्हणाले,आज देशात परिस्थिती खूप वाईट आहे. दलित, आदिवासी, स्त्रियांच्यावरील अत्याचार वाढले आहेत. धर्म आणि जातीच्या नावाखाली माणसांच्या मध्ये भिंती उभा करून धार्मिक व जातीय विद्वेष पसरवला जात आहे.
प्रारंभी राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी भांबे गावातून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन स्त्रियांच्या हस्ते करण्यात आले. भांबेच्या सरपंच सरस्वती गुरव, कमलताई कदम, सुनंदा काटे, सुवर्ण निकम, शकुंतला मोरे, उषा मोरे, ज्योती निकम, अलका काटे, मयुरी काटे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. हणमंत काटे यांनी स्वागत केले. यावेळी ॲड. शरद जांभळे, दिलीप पाटील, डी.के.बोडके, नजीर चौगुले, मारुती पाटील, प्रदीप निकम, आनंदा सपकाळ, गुलाब काटे, सुभाष काटे, सदाशिव काटे, बाजीराव काटे रमेश शिंदे, देवानंद कदम, उदय पाटील, सुरेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.