

म्हसवड : सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाला 10 लाखांचा गंडा घालून पसार झालेल्या संशयिताला म्हसवड पोलिसांनी जेरबंद केले. पाच महिन्यांपासून पसार असलेला संशयित कुर्ला (पश्चिम), मुंबई येथे म्हसवड पोलिसांच्या जाळ्यात अडकला. संशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
जोतीराम बालमुकुंद काटकर (रा. वडजल, ता. माण, जि. सातारा, सध्या मुंबई) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत फिर्यादी जयवंत राजाराम घाडगे (रा. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी 22 ऑगस्ट 2025 रोजी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. काटकर याने मंत्रालयात नोकरी असल्याचे सांगत फिर्यादींच्या मुलीला सरकारी नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीकडून 10 लाख रुपये घेतले. मात्र दीर्घकाळ नोकरी न मिळाल्याने फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आला.
गुन्हा दाखल होण्याच्या एक वर्ष आधीपासून काटकर हा फिर्यादींचा विश्वास संपादन करून फसवणुकीचे डावपेच रचत होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर काटकर पाच महिन्यांपासून पसार होता. त्याच्या शोधासाठी म्हसवड पोलिसांनी तांत्रिक तपासासह विविध ठिकाणी चौकशी केली. अखेर मुंबईत लपून बसल्याची खात्री पटताच सपोनि अक्षय सोनवणे यांनी विशेष पथक तयार करून कुर्ला (पश्चिम) येथे कारवाई करत काटकरला शिताफीने जेरबंद केले.
चौकशीत काटकरने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अक्षय सोनवणे, पोलिस हवालदार देवानंद खाडे, पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे व अनिल वाघमोडे यांच्या पथकाने केली.