

फलटण : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा दर्पण पुरस्कार यावर्षी दैनिक ‘पुढारी’ सातारचे विभागीय व्यवस्थापक, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. त्यांच्याबरोबरच राज्यातील ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे (पुणे), शंतनु डोईफोडे (नांदेड), बसवेश्वर चेणगे (मसूर), प्रकाश कुलथे (श्रीरामपूर), विजय पालकर (माणगाव), श्रीराम जोशी (अहिल्यानगर), डॉ. अनिल काळबांडे (यवतमाळ), आशिष कदम (कोल्हापूर) हेही या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
या पुरस्काराचे वितरण 6 जानेवारी 2026 च्या राज्यस्तरीय पत्रकार दिनी ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग या जन्मगावी मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी दिली.
वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दर्पण पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावर्षीच्या पुरस्काराची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी रविवारी केली. जीवनधर चव्हाण यांच्यासह अन्य पुरस्कार मूर्तींची नावेही त्यांनी यावेळी जाहीर केली.
रोख रक्कम, शाल, पुष्पगुच्छ, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा चरित्र ग्रंथ व विशेष सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जीवनधर चव्हाण हे 1993 पासून दैनिक ‘पुढारी’मध्ये कार्यरत असून कृष्णा खोरे महामंडळ स्थापनेनंतर तत्कालीन परिस्थितीत धरणग्रस्तांच्या पुनर्वसनावर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका, तमाशा कलावंतांची परिस्थिती उजेडात आणणारी मालिका यासह मांढरदेव दुर्घटना, प्रतापगड आंदोलन, खरोशी दुर्घटना, संगम माहुली जिलेटीन स्फोट, दुष्काळी दाहकता आणि राजकीय विश्लेषण याबाबतही त्यांनी केलेले लिखाण उल्लेखणीय ठरले आहे. ‘खबरबात’ या ऐतिहासिक सदरातून त्यांनी समाजातील चुकीच्या प्रथांवर कोरडे ओढले होते. सामाजिक, सांस्कृतिक, सहकार यासह विशेष करून राजकीय विषयांवर त्यांनी विपुल लिखाण केले आहे. वृत्तपत्र सृष्टीतील त्यांच्या व्यापक योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे दर्पण पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, यावर्षापासून विशेष बाब म्हणून राज्यातील माहिती व जनसंपर्क विभागातील उत्कृष्ट शासकीय व अन्य क्षेत्रातील प्रभावी वृत्तांकन लेखन करणारे अधिकारी यांच्यामधून एकाची ‘दर्पण’ पुरस्कारासाठी निवड करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. त्यानुसार यावर्षीचा असा पहिलाच ‘दर्पण’ पुरस्कार पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना देण्यात येणार असल्याचे रविंद्र बेडकीहाळ यांनी सांगितले. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी या सर्व पुरस्कारप्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले आहे.
‘पुढारी’ परिवाराचा षटकार
अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘दर्पण’ पुरस्कारावर आत्तापर्यंत ‘पुढारी’चाच वरचष्मा राहिला आहे. जीवनधर चव्हाण यांच्या रूपाने ‘पुढारी’ परिवाराने षटकार मारला आहे. यापूर्वी ‘पुढारी’ परिवारात दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक तथा पत्रमहर्षी पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, तत्कालिन विभागीय व्यवस्थापक स्व. विलास माने, दै. ‘पुढारी’चे सातारा निवासी संपादक हरीश पाटणे, सांगलीचे अशोक घोरपडे, कराडचे स्व. मोहन कुलकर्णी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
पुरस्कार डॉ. प्रतापसिंह जाधव यांना विनम्रपणे समर्पित : जीवनधर चव्हाण
गेल्या 32-33 वर्षांपासून ‘पुढारी’च्या माध्यमातून पत्रकारिता करण्याची संधी आपल्याला मिळाली. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी ही संधी दिल्याने पत्रकारितेत आपण या उंचीवर पोहचू शकलो. आज आपल्याजवळ जी काही उपलब्धी आहे त्यात ‘पुढारी’चा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच दर्पण पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून ‘पुढारी’ परिवाराचा आहे. हा दर्पण पुरस्कार आपण आदरस्थान पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना विनम्रपणे समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जीवनधर चव्हाण यांनी व्यक्त केली.