

सातारा : दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण व खटाव तालुक्यासह कोरेगाव व सातारा तालुक्यातील एकूण 167 गावांतील सुमारे 60 हजार 437 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी लक्ष्मणराव इनामदार जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेच्या विस्तारित कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर माण-खटावसह परिसरात हरितक्रांती होऊन ही भूमी सुजलाम-सुफलाम होईल, असा विश्वास खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
खा. उदयनराजे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन 1996-97 मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना माण-खटाव भागावरील दुष्काळी ठपका पुसण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले. त्यानुसार उरमोडी धरणासह जिहे-कटापूर उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाली. या योजनेस प्रारंभी 269 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. सन 2022 मध्ये या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश झाल्याने केंद्र सरकारकडून भरीव निधी उपलब्ध झाला.
या प्रकल्पांतर्गत 11 उपसा सिंचन योजना, 3 बॅरेज, 4 गुरुत्वीय नलिका, येरळा नदीवर 15 व माण नदीवर 17 कोल्हापूर टाईप बंधारे, 4.095 कि.मीचा वर्धनगड बोगदा व 12.746 कि.मी. आंधळी बोगदा अशी महत्त्वाची कामे समाविष्ट आहेत. प्रकल्पातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे जून 2026 व मार्च 2029 पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने उर्वरित कामांना गती मिळून सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होईल, असा विश्वास खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.