

भुईंज : परेल ते कोल्हापूरला जाणार्या बसमधील प्रवासी महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांवर महिला चोरट्यांनी डल्ला मारला आहे. संशयित महिलांनी प्रवासी महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने असलेला डबा लांबवला. या घटनेत साडेसहा लाखांचा ऐवज लंपास झाला आहे. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी जुबेरा आब्बास रमदूल (रा. साखरप्पा ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. जुबेरा या एसटीतून कोल्हापूरला निघाल्या होत्या. शिरवळ येथे बस आली असता काही प्रवासी उतरल्यानंतर पाच महिला व तीन लहान मुले एसटीबसमध्ये बसली होती. त्यांना बसण्यास सीट नसल्याने त्यातील महिला जुबेरा यांच्या सीट शेजारी उभी राहिली होती. त्यावेळी त्यांच्याकडील नाणी खाली पडल्याचा बहाणा करुन ती गोळा करण्याच्या उद्देशाने जुबेरा यांच्या पिशवीतील सोन्याच्या दागिन्यांचा डबा गायब केला.
त्यानंतर खंबाटकी घाट उतरल्यानंतर बस एका हॉटेलवर जेवनासाठी थांबली असता जुबेरा यांनी आपले साहित्य व्यवस्थित आहे का याची खात्री केली असता त्यातील दागिण्यांचा डबा असलेली पिशवी गायब झाल्याचे लक्षात आले. यानंतर बस भुईंज पोलिस ठाण्यात आणून संशयित महिलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.