

वेलंग : यात्रेला आलेल्या माहेरवासिनीचे वाई एसटी स्टँडवरुन सुमारे सव्वा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उज्वला चव्हाण (रा. दहिगाव, ता. कोरेगाव) या आपल्या माहेरी लोहारे येथे यात्रेनिमित्त आल्या होत्या. यात्रा झाल्यानंतर त्या दहिगाव येथे जाण्यासाठी शुक्रवार दि. 25 रोजी दुपारी 3 वाजता वाई एसटी स्टँडवर आल्या. तेथून त्यांनी वाई ते वाठार जाणारी एसटी पकडली. त्या एसटीत चढत असताना प्रवाशांची जास्त गर्दी होती. एसटीमध्ये बसल्यानंतर तिकिटासाठी पैसे काढताना त्यांना त्यांच्या पर्सची चेन उघडी असल्याचे दिसून आले. त्यांनी पर्समध्ये पाहिले असता त्यांना पर्समधील सोन्या-चांदीचा ऐवज ठेवली डबी दिसून आली नाही.
त्यामुळे त्यांनी एसटी थांबवून दागिन्यांचा शोध घेतला, मात्र ते मिळून न आल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या पर्समधील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याची चेन व 50 हजार रुपयांचा लक्ष्मी हार, चांदीचा करंडा व एक हजार रुपये रोख रक्कम असा 1 लाख 11 हजार 200 रुपयांचा ऐवज अज्ञाताने लंपास केला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज करीत आहेत.