Devendra Fadnavis| जयकुमार गोरेंनी वारीच्या व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवले

मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक : विचारांसह परिसराचीही निर्मलता ठरली माईलस्टोन
Devendra Fadnavis, Jaykumar Gore
Devendra Fadnavis, Jaykumar Gore
Published on
Updated on

खटाव : गेल्या वर्षी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आषाढी वारीच्या नियोजनात नवीन बेंचमार्क्स प्रस्थापित केले होते. यावर्षीही आणखी व्यापक आणि तयारी करुन त्यांनी व्यवस्थापनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करुन वारीचे चित्रच बदलले असल्याचे कौतुगोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर येथे ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाची ‘निर्मल वारी’ व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा ‘चरणसेवा’ या उपक्रमांचा समारोप समारंभ पार पडला. त्यावेळी बोलताना ना. फडणवीस म्हणाले, वारीची परंपरा प्राचीन काळापासून शतकानुशतके अखंड सुरू आहे. महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यांतून आषाढी आणि कार्तिकी वारीच्या निमित्ताने भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन लाखो वारकरी पायी पंढरीकडे मार्गक्रमण करतात. मोगलांच्या आक्रमणाच्या काळात आणि इंग्रजांच्या राजवटीतही ही वारी कधीच थांबली नाही. सर्व संकटांवर मात करत ही परंपरा अखंड सुरू राहिली. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि भक्तिमार्गाची राजधानी असलेल्या या भूमीत वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे, हे आपले कर्तव्य आहे.

पालखी मुक्कामाची गावे आणि पंढरपूरमधील रोगराई व दुर्गंधीची समस्या सोडवण्यासाठी २०१६ मध्ये प्रथमच 'निर्मल वारी' उपक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर २०१७ मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करून हा उपक्रम अधिक व्यापक करण्यात आला. वारीत चालून थकलेल्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत 'चरणसेवा' हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम राबवताना युवा डॉक्टर आणि स्वयंसेवक अत्यंत भक्तिभावाने सेवा करताना दिसले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यावर्षी १४ जिल्ह्यांमध्ये वारीचे अत्यंत सुयोग्य नियोजन करण्यात आले. या व्यवस्थेबाबत वारकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. यामध्ये ५००० फिरती शौचालये, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था तसेच स्वच्छतेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच पंढरपूरचे वाळवंट स्वच्छ करून चंद्रभागा नदी निर्मळ करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये ३० ते ३५ लाख वारकरी येऊन गेल्यानंतरही पंढरपूर स्वच्छ राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जयकुमार गोरे ग्रामविकास विभागाचे मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री झाल्यापासून वारीच्या नियोजनात चांगले परिवर्तन झाले. गेल्या वर्षीही लाखो वारकरी व्यवस्थेबाबत समाधानी होते. पुढील वर्षी कॉरिडॉर झाल्यावर ४० ते ५० लाख वारकरी हॅंडल करण्याची क्षमता निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news