

म्हसवड : अहिल्यादेवी होळकर या हिंदुहृय सम्राज्ञी होत्या. त्यांनी 15 मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. त्यांनी केलेलं कार्य पुढे चालवणं हे माझ्यासाठी भूषणावह आहे. पुढच्या काळामध्ये अहिल्यादेवींच्या विचारांना बरोबर घेऊन मी प्रामाणिकपणे अखंड जनतेची सेवा करणार असून अहिल्यादेवी होळकरांचे विचार समाजात रुजवण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. दरम्यान, म्हसवड शहरातील विकास कामांसाठी निधी कमी पडून देणार नसल्याचेही ते म्हणाले.
म्हसवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, माण तालुका भाजपचे नेते शिवाजीराव शिंदे, डॉ. प्रमोद गावडे, इंजिनिअर सुनील पोरे, माजी नगराध्यक्ष सुरेश म्हेत्रे ,भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रशांत गोरड उपस्थित होते.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, माण तालुका हा सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. या माण तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी गेली 15 वर्ष अहोरात्र प्रयत्न केले आणि यामुळे या पुढच्या निवडणुका पाणी प्रश्नावर लढवणार नाही, अशी प्रतिज्ञा मी केली होती. माण तालुका सुजलाम सुफलाम झाल्याचे स्वप्न आता निर्माण झाले आहे. माण तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी मी अहोरात्र कष्ट केले आणि जनतेने मला साथ दिली यामुळेच माण तालुक्यातील जनतेचा दुष्काळाचा कलंक पुसला गेला.
विरोधक केवळ टीका करतात, मात्र त्यांनी महापुरुषांचा विचार कधीच आरचरणात आणला नाही. केवळ जातीचा वापर राजकारणासाठी केला. यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळाल म्हसवड येथे उभारण्यात येणार असून या पुतळ्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर म्हसवड शहरातील विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. म्हसवड येथील सनगर समाज सभागृहासाठी एक कोटी रुपये अनुदान देण्यात आले असून सनगर समाजाचे भव्य असे सभागृह उभारण्यात येणार आहे.
डॉ. वसंत मासाळ म्हणाले, माण तालुक्यातील जनतेसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे खर्या अर्थाने विठ्ठल आहेत. माण तालुक्याच्या विकासाचा वसा त्यांनी पुढे चालू ठेवला आहे म्हणूनच माण तालुका हा अधिक विकसित होणार आहे. अहिल्यादेवींच्या रूपाने होणारा भव्य अश्वारूढ पुतळा हा धनगर समाजासाठी भूषणावह आहे. मात्र धनगर समाजासाठी आद्ययावत असं समाज मंदिर बांधण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी यांनी केली.यावेळी डॉ. प्रमोद गावडे, डॉ. बाबासाहेब दोलताडे, शंकर वीरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्रात सर्वाधिक विकसित अशी एमआयडीसी उभारणार
म्हसवड शहरात विकासाच्या दृष्टीने एमआयडीसीचा भव्य प्रकल्प उभारण्यात येणार असून महाराष्ट्रात सर्वाधिक विकसित अशी एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. माण तालुक्यातील जनतेच्या प्रेमामुळे आपण तीन वेळा निवडून आलो आणि मंत्री झालो हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. माण तालुक्यातील तरुणांना काम देण्यासाठी व तालुक्यातील मेंढपाळ व शेतकरी यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी अहोरात्र आपण प्रयत्न करणार असल्याचे ना. जयकुमार गोरे म्हणाले..