

सातारा : संपूर्ण जिल्हा परिषदेत पालकमंत्र्यांनी उच्छाद मांडला होता. पोलिसांपासून सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी शिवीगाळ केली. ‘काय रे, कोण आहे रे, माज आलाय का?, मस्ती आलीय का?, बघून घेईन, काय रे काय बघतोस?, का थांबलायंस?, का इथं आलाय?’ हे कोण बोलले? पोलिस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी असे वर्तन कोणी केले? ही कुठली लोकशाही आहे? ते कोणत्या लोकशाहीच्या गप्पा मारताहेत? तुम्ही यशवंतराव चव्हाण यांचे विचार शिकवता, पण त्यांच्याच जिल्ह्यात असला पालकमंत्री कसं काय काम करतो? भाजपने हे केले, ते केले सांगता पण पाटण आणि वाईमध्ये काय चाललंय? हेही पाहिलं पाहिजे. पेरलेलं कधीतरी उगवतंच, अशा शब्दांत जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत घणाघात केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले, आ. मनोज घोरपडे, आ. डॉ. अतुल भोसले, जि.प. उपाध्यक्ष राजू भोसले, विक्रम पावसकर, धनंजय जांभळे, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, धैर्यशील कदम, अजित साळुंखे उपस्थित होते.
भाजपला मतदान करणाऱ्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करणार असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे, याबाबत विचारले असता ना. जयकुमार गोरे म्हणाले, आज जे पोलिसांच्या नावाने आकांडतांडव करत आहेत त्यांना आजपर्यंत पोलिसांची सेवा घेताना बरं वाटलं. पाच-पाच पोलिस गाड्या पुढे-मागे घेऊन पोलिसांची हॅरेशमेंट करणे, चौकात पोलिस नाही म्हणून त्यांना सस्पेंंड करणे, देवाच्या दर्शनावेळी संपूर्ण सातारा शहराला वेठीस धरणे या कसल्या बाबी आहेत? आजपर्यंत पोलिसांना वेठिस धरायचं काम कुणी केलं? एसपींशी घरगड्यासारखं बोलून वर्तन केले. जिल्हा परिषदेत पालकमंत्र्यांनी स्टाईलमध्ये एंन्ट्री करून पोलिसांवर शिव्यांचा भडीमार केला, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसेल. निवडणूक असताना त्यांनी जिल्हा परिषद गेटच्या आत जायचं कारणच काय? अधिकाऱ्यांना दमबाजी का केली? आजपर्यंत त्यांनी जिल्हा परिषदेत कधी बैठक घेतली नाही. निवडणुकीवेळी त्यांनी बैठक कशी काय लावली? कलम 306 अन्वये गुन्हे दाखल असणाऱ्या संशयितांना हाताला धरून कसे काय नेता? खोटा गुन्हा दाखल केला असं ते सांगत असताना तो गुन्हा कुणी दाखल केला हे का सांगितलं नाही? डांबून ठेवलेले सदस्य व तक्रारदार हे राष्ट्रवादीचे आहेत. वडिलांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या मुलाने केली आहे. यामध्ये भाजपचा संबंध येतो कुठे? असा सवालही ना. जयकुमार गोरे यांनी केला आहे.
लोकशाहीचा खून, खोटे गुन्हे दाखल केले हे दोन्ही मंत्री ठासून सांगत असताना हे कुणी केलं, ते का त्यांनी सांगितलं नाही? हा दोन्ही मंत्र्यांना माझा सवाल आहे. तुम्ही लोकशाहीची पुजा करता तर तुमच्या सदस्यांवर तुमचा विश्वास का नव्हता? त्यांना 45 दिवस का डांबून ठेवले? गाडीतून उतरतानाही त्यांना न सोडता त्यांच्या हाताला धरून जाताना सदस्यांवर दबाव नव्हता का? ही लोकशाही आहे का? मतदानावेळी किती अंतरावर थांबायचे असते? पालकमंत्री झेडपीत कुठपर्यंत आले होते? संपूर्ण जिल्हा परिषदेत पालकमंत्र्यांनी उच्छाद मांडला होता. पोलिसांपासून सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी शिवीगाळ केली. अशापद्धतीने निवडणुका होतात का? तुम्ही यशवंतराव चव्हाण यांचे विचार शिकवता, त्यांच्या जिल्ह्यात या पद्धतीचा पालकमंत्री कसं काय काम करतो? भाजपने हे केले, ते केले सांगता आज पाटण आणि वाईमध्ये काय चाललंय? हेही आपण पाहिलं पाहिजे. अशा प्रसंगातून आम्ही अनेकदा गेलो आहे. हे सर्व आम्ही भोगलं आहे. पेरलेलं कधीतरी उगवतंच, अशा शब्दांत जयकुमार गोरे यांनी टीका केली.
पालकमंत्री बदलण्याची मागणी करणार का? असे विचारले असता ना. जयकुमार गोरे म्हणाले, पालकमंत्री बदलण्याची काय गरज आहे? आम्हाला पालकमंत्री आवडत असताना कशाला बदलायला सांगू? चांगलं चाललंय. ग्रामविकास खात्याचा मंत्री असल्याने जिल्हा परिषदेत मीच पहिला रूबाब मारायला पाहिजे होता. सगळी यंत्रणा माझ्या पुढे-मागे फिरली असती. लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रिया होत असताना मी जिल्हा परिषदेत गेलो नाही. झेडपी मतदानावेळी सीईओंना लेखी पत्र देवून बैठक घ्यायला पालकमंत्री कसे काय सांगतात? लोकशाहीची तत्व सांगताना लोकशाहीची मुल्ये जपण्याची जबाबदारी आपलीही आहे. पोलिसी कारवाईत राजकीय हस्तक्षेप केला नसता तर त्या दोन्ही सदस्यांना मतदान करता आले असते. पोलिसांनी आरोपींना हात लावायचा नाही, ही कुठली पद्धत? त्या सदस्यांनी मतदान केले असते तरी ते जिंकत नव्हते.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पालकमंत्री, पुनर्वसन मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस आणि उबाठा गट यांची ही अलायन्स होती. त्यांच्याशी महायुतीचा संबंध नाही. त्यांची युती अनैसर्गिक होती. महायुतीचे नियम या निवडणुकीला लागू नाही. त्यांनी सुरूवात केली होती, शेवट आम्ही केला. जिल्ह्यात भाजप स्वत:च्या ताकदीवर लढला असून जिल्हा परिषदेतही स्वत:च्या ताकदीवरच काम करेल. आम्ही कुणासोबतही अलायन्स करणार नाही. जिल्हा परिषदेत आम्ही स्वतंत्रपणे काम करू.
पाटण तालुक्यात भाजपचा पालकमंत्री सत्यजितसिंह पाटणकर आहेत. सरकारचा पालकमंत्री असं मी म्हटले नाही. पालकमंत्र्यावर कुणी बोलायचं नाही, असं त्यांना का वाटतं? त्यांच्या पालकमंत्रीपदावर कधीही बोललो नाही.आम्ही संयमाने वागतो. आम्ही बोललो तर ‘बात बहुत लंबी तक जायेगी..’ काय चालतं, किती चालतं ते मी कधीही काढत नाही. माणमध्ये चिट्ठीवर निवडणूक झाली. पराभव स्वीकारला ना. आमच्यावर कोण हसलं, कुणी टिंगल केली हे आम्ही पाहिलं आहे. भाजप कार्यकर्त्याला जिथं गरज लागेल तिथे आम्ही उभे राहणार. कोण नाराज होईल, त्याचा विचार करणार नाही. कालच्या निवडणुकीत कुणाला वाईट वाटलं याची फिकीर करायची कारण नाही.
पोलिस-पालकमंत्र्यांमध्ये काय प्रेम हे आम्हाला काय माहित? : ना. शिवेंद्रराजे
शंभूराज देसाई हे जिल्ह्याचे पालकमंत्री असून उलट त्यांचाच सर्वांवर दबाव असायला हवा. जयाभाऊ आणि मी त्यांच्यानंतर आत्ता मंत्री झालो. त्यांनी मागील टर्ममध्ये गृहखातं सांभाळलं आहे. त्यामुळे दबाव असला तर तो पालकमंत्र्यांचाच असला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या या निवडणूक प्रक्रियेशी काहीही संबंध नाही. या निवडणुकीत त्यांनी लक्ष घातलेलं नाही. त्यांचा फोन झाला असं मोघम बोलण्याला अर्थ नाही. पोलिसांना कुणी आणि कशी वागणूक दिली हा आमचा विषय आहे का? ही चर्चा खरी असली तर हा ज्वालामुखी आम्ही पेटवला का? पोलिस आणि पालकमंत्री यांच्यात काय प्रेम आहे आम्हाला माहित नाही. गुन्हा दाखल झाला त्यानुषंगाने पोलिसांनी कारवाई केली. झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीला आम्ही पूर्णपणे लोकशाही पद्धतीने सामोरे गेलो. त्यांनी डांबून ठेवलेल्या एका सदस्यानेही आम्हाला मतदान केले. निवडणुकीत आमचे बहुमत असल्याने सत्ता स्थापन केली, असेही त्यांनी स्पष्ट केले.