

फलटण : गत तीस वर्षापासून सत्तेत असलेल्यांनी सत्ता टिकवण्यासाठी सत्तेचा वापर केला. जनतेला धमकावले. तालुक्याचा विकास रोखला. शहराचे व तालुक्याच्या मातीचे मोठे नुकसान केले. तालुक्याच्या हिताआड येणाऱ्या या विकास विरोधी प्रवृत्तीचा अंत झाला असून खऱ्या अर्थाने विकासाचा नवा अध्याय सुरु झाला आहे. फलटणकरांनी रणजितसिंह या विकासाभिमुख नेतृत्वाला स्वीकारले असून षडयंत्रकारी नेतृत्वाला नाकारले आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
फलटण नगरपरिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर गजानन चौकात आयोजित मतदार आभार सभा व नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हाद साळुंखे पाटील, जिजामाला नाईक निंबाळकर, शिवरुपराजे खर्डेकर, नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, व पदाधिकारी उपस्थित होते.
ना. गोरे म्हणाले, फलटण तालुक्यात तीस वर्षात सभापती, मंत्री, पालकमंत्रीपद, आमदारकी व सर्व सत्तास्थाने असतानाही रेल्वे, पाणी, एमआयडीसी, रुग्णालयांना येथील नेतृत्वाने विरोधच केला. येथील नेतृत्व तालुक्याच्या विकासाचा विचार करण्याऐवजी सतत विकास कामांना अडवण्याचे काम त्यांनी केले. विकास कामे होऊ दिली नाहीत. केवळ सत्तेचा वापर सत्ता टिकवण्यासाठीच केला. सत्तेपासून दूर गेल्यानंतर त्यांची तडफड सुरू झाली. विकास न झाल्याने जनतेत त्यांच्याविषयी तीव्र नाराजीच्या भावना भरलेल्या होत्या. त्याचा कडेलोट दिसून आला. विकासाच्या मुद्यावर येथील निवडणूक लढवली गेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. याउलट रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदारकीला पराभव झाल्यानंतरही नियोजनबद्ध विकास कामांचा डोंगर उभा करून जनतेचा विश्वास संपादन केला. विकास कामांमध्ये रणजितसिंह हे माझ्यापेक्षाही वरचढ ठरले आहेत. फलटण नगरपालिकेला मतदारांनी जो आमच्यावर विश्वास टाकला आहे, तो विकासकामाच्या माध्यमातून निश्चितच पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रणजितसिंह म्हणाले, फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी मला बदनाम करण्याचा एक कलमी कार्यक्रम प्रचारात अवलंबला. माझ्या विरोधात कुभांड रचले. परंतु जनतेने त्यांना नाकारले. राजाला खुश करणारे चापलूसी, चापलूसींचे ऐकून खुश होणारा राजा. विकास कामे न करता तीस वर्षे तालुक्यात हे चालले होते. आता राजाही संपला व चापलूसही संपले. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जनहिताचा विचार करून कर्तव्य भावनेने कामे करावे. तीस वर्षात जे झालं नाही ते सहा महिन्यात करायचं आहे. शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्याची जबाबदारी माझी, आ. सचिन पाटील व मंत्री जयकुमार गोरे यांची राहील. नगराध्यक्ष समशेरसिंह म्हणाले, फलटण हे माझं घर आहे आणि घराची काळजी घेणे हे माझं कर्तव्य आहे. विरोधकांनी तीस वर्षात फलटण शहराचं खेडं करुन टाकलं. फलटण भकास बनवलं. फलटण शहराला त्यांनी उत्पन्नाचे साधन समजलं. ओपन पेस गिळंकृत केले. पाण्याच्या टाक्या बांधल्या, पण त्यात पाणी सोडलं नाही. खावठीच्या तरतुदीचा स्वाहाकार केला. जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आहे. त्या विश्वासास पात्र राहून फलटण शहरातील रस्ते येत्या सहा महिन्यात खड्डेमुक्त करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आ. सचिन पाटील म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत विरोधकांनी द्वेषाचं राजकारण केलं. जनतेच्या मूलभूत सोयीसुविधा रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य या सुविधा जनतेला प्राधान्याने पुरवण्याबरोबर फलटण शहराचा चेहरा-मोहरा बदलून बारामती सारखा विकास करुन दाखवू. यावेळी प्रल्हाद साळुंखे पाटील, ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, ॲड. नरसिंह निकम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वासराव भोसले, अनुप शहा, सनी अहिवळे, संतोष सावंत, बजरंग गावडे, मनीषाताई नाईक निंबाळकर उपस्थित होते. सूत्रसंचलन आनंदा पवार यांनी केले. आभार रणजितसिंह भोसले यांनी मानले.