

Minister Jaykumar Gore controversy updates
सातारा : राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या गाजत असलेल्या प्रकरणात आता एक नवा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात एका मांत्रिकाची एन्ट्री झाली असून, साताऱ्याच्या वडूज पोलिसांनी थेट दिल्लीत मोठी कारवाई करत अशोक शर्मा नावाच्या या मांत्रिकाला अटक केली आहे. खंडणी मागणाऱ्या महिलेला हाच मांत्रिक मार्गदर्शन करत होता आणि त्याच्याच सांगण्यावरून तिने ही खंडणी मागितल्याची कबुली मांत्रिकाने दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांना एका महिलेने खंडणी मागितल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या वडूज पोलिसांना तपासादरम्यान यामागे एका मांत्रिकाचा हात असल्याची माहिती मिळाली. हा मांत्रिक दिल्लीतील लक्ष्मीनगर परिसरात वास्तव्यास असून, तोच खंडणी मागणाऱ्या महिलेला वेळोवेळी मार्गदर्शन करत होता, असेही तपासात निष्पन्न झाले.
या माहितीच्या आधारे वडूज पोलिसांच्या पथकाने तात्काळ दिल्ली गाठली. अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचून पोलिसांनी अशोक शर्मा या मांत्रिकाला मथुरेजवळून अटक केली. प्राथमिक चौकशीत, महिलेने आपल्याच सांगण्यावरून मंत्री गोरे यांच्याकडे खंडणी मागितल्याची कबुली शर्मा याने दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खंडणी म्हणून मागितलेल्या १ कोटी रुपयांच्या रकमेतील काही हिस्सा या मांत्रिकालाही दिला जाणार होता, अशी माहितीही तपासात पुढे आली आहे.
अशोक शर्मा याच्या अटकेमुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. या मांत्रिकाच्या अटकेनंतर आणखी कोणते धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात आणि या प्रकरणामागील संपूर्ण सत्य कधी उघडकीस येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.