

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या सूचना देतील, त्या अनुषंगाने भाजप पुढील भूमिका ठरवेल. सर्वजण एकत्र बसून चर्चा करतील. चर्चेतून सर्व काही सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, त्यातून मार्ग निघाला नाही तर भाजप म्हणून आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढवू. आवश्यकता भासली तर मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल, अशी भूमिका ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत चर्चा होणे आवश्यक आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे भाजपचे नेते आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यांचे स्वागत आहे. पक्षांतर्गत चर्चा झाल्यानंतर आम्हीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत निर्णय घेऊ. त्यानंतर आवश्यकता भासल्यास सहकारी पक्षांशी चर्चा करू. यातून मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, मार्ग निघाला नाही तर भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाईल, असेही ना. गोरे यांनी स्पष्ट केले.
माण-खटाव मतदारसंघातील अनेक ठरावधारक 'ट्रीप'ला गेल्याच्या चर्चेबाबत विचारले असता ना. गोरे म्हणाले, माण-खटावमध्ये कोणालाही ट्रीपवर नेण्याची गरज भासणार नाही. या मतदारसंघातील बहुसंख्य ठराव भाजपच्या विचाराचे आहेत. त्यामुळे येथे संघर्षाची कोणतीही स्थिती नाही. संपूर्ण जिल्ह्यात जास्तीत- जास्त संचालक भाजपचे निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणाचे जोडे बँकेच्या बाहेर ठेवावेत, अशी भूमिका खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. याबाबत विचारले असता गोरे म्हणाले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा हेतू चांगला असला तरी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर केलेली भरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियेत भाजपच्या नेत्यांना विश्वासात घेतले गेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.