

वाई : बावधन गावाची संस्कृती, इतिहास आणि ताकद येथे दिसते. येथील नेत्यांनी माझे लवकर ऐकावे, ऐकणार्यांचे कल्याण होते, हा इतिहास आहे, असे म्हणत ग्रामविकास, पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या सौ. अरुणादेवी पिसाळ व शशिकांत पिसाळ यांना भाजप पक्षप्रवेशाची खुली ऑफर दिली.
तालुका भाजपच्या वतीने ना. गोरे यांचा मानपत्र व तलवार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. अरुणादेवी पिसाळ, तालुका सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ, जिल्हा महिला मोर्चाचे अध्यक्षा डॉ. सुरभि भोसले, माजी जि. प. सभापती सुनील काटकर, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अरुण गोरे, रोहिदास पिसाळ, सरपंच वंदना कांबळे, ऋषिकेश धायगुडे यांची उपस्थिती होती.
ना. गोरे यांनी बावधनच्या भैरवनाथ क वर्ग देवस्थानास ब वर्ग आणि 5 कोटी रुपये, तर स्मशानभूमीसाठी 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली. पक्ष कार्यकर्त्यांनी संघर्षाचे गाणे गायचे नाही, यातून घडलेला माणूस राजकारणात थांबत नाही. बावधनमध्ये राजकारण ठरविण्याची ताकद आहे. राजे-महाराजांच्या, प्रस्थापितांच्या जिल्ह्यात माझ्या पाठीशी तर काळाकुट्ट अंधार होता. कार्यकर्त्याला त्रास होणार नाही, यासाठी मी इथे आलोय. मी राजकारणात आलो नसतो तर आज माझ्याकडे स्वतःचे हेलिकॉप्टर असते, असेही ते म्हणाले.
सौ. अरुणादेवी पिसाळ म्हणाल्या, विधानसभेला उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपने तीन आठवड्यात चांगली साथ केली. चांगले संघटन व मित्रमंडळ यांच्या सोबतीने एकत्र काम करू. डॉ. सुरभि भोसले म्हणाल्या, मदनराव पिसाळ यांच्या व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘टो ट्युनिंग’ आहे. मंत्रिपद, खासदारकी, जिल्हा बँक कारखाना एकाच घरात आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून करूया. कुसगाव क्रशरसाठी आम्हाला आंदोलन करावे लागले, तेथील खडी कोठे जाते? असा प्रश्न करून येथील मंत्री त्यासंबंधी बोलत नसल्याचे सांगितले.
कवठे- केंजळ पाणी योजनेसंबंधी मंत्री गोरे यांनी आम्हास सहकार्य करावे, असेही त्या म्हणाल्या. दीपक ननावरे यांनी बावधन गावाने जिल्ह्याच्या राजकारणावर कमांड ठेवल्याचे सांगितले. सुनील काटकर, युवक राष्ट्रवादीचे अॅड. विजयसिंह पिसाळ, अॅड. विजय ठोंबरे,अंकिता कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन भोसले यांनी स्वागत, सुनील कदम यांनी प्रास्ताविक केले. संदीप पिसाळ यांनी आभार मानले.