Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेचा गुलाल लावूनच सोलापुरात जाणार!

ना. जयकुमार गोरे यांच्या विधानाने जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकारणाला नवे वळण
Jaykumar Gore
Jaykumar Gore
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल लावूनच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मी सोलापुरात येईन, असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या विधानामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार की महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला सोबत घेणार, याबाबत तर्क-वितर्कांना वेग आला आहे.

सातारा आणि सोलापूर या दोन्ही जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून साताऱ्यात मतदार निश्चितीच्या ठरावांची लगबग सुरू आहे. प्रत्येक तालुक्यात सहकारी संस्थांचे ठराव आपल्या बाजूने करून घेण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक गावांमध्ये ठराव प्रक्रियेदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी भाजपने केंद्र व राज्यातील सत्तेच्या बळावर जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. प्रत्यक्ष निवडणूक ऑक्टोबरमध्ये अपेक्षित असली तरी सध्या मतदार निश्चितीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. बँकेच्या दहा मतदारसंघांसाठी एकूण १,७६४ मतदार निश्चित केले जाणार असून ५ ऑगस्टपर्यंत सर्व ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत.

ठराव प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी संघर्षाची स्थिती निर्माण होत आहे. विशेषतः जावळी तालुक्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांमध्ये अनेक गावांत चुरस निर्माण झाली आहे. आखाडे येथे ठराव प्रक्रियेदरम्यान दोन गट आमनेसामने आल्याने पोलिसांच्या उपस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. याच पार्श्वभूमीवर हातगेघर येथे ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ठराव प्रक्रियेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सार्वजनिक कार्यक्रमांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

दुसरीकडे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यात स्वतः लक्ष घालून बहुतांश सहकारी संस्थांचे ठराव आपल्या बाजूने वळविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे माण तालुक्यात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

जिल्हा बँक कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेण्याचा निर्धार भाजपने केल्याचे सध्याच्या राजकीय हालचालींवरून दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत संख्याबळ कमी असतानाही भाजपने सत्ता स्थापन केली होती. त्याच रणनीतीची पुनरावृत्ती जिल्हा बँक निवडणुकीत करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. जयकुमार गोरे यांच्या विधानामुळे या चर्चेला आणखी खतपाणी मिळाले असून निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे साताऱ्यातील सहकार आणि राजकारणाचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news