

सातारा : राष्ट्रवादीच्याच सदस्याच्या मुलाने गुन्हा दाखल केला त्यात आमचा काय रोल? हा राष्ट्रवादीच्या अंतर्गत असणारा विषय आहे. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस त्यांचे काम करतील. शिवसेनेचा व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वर कितीही सांगितले तरी खाली सदस्यांमध्ये कधीही एकमत नव्हते. येथे थेट त्यांच्यामध्ये जो असंतोष होता त्याचाच परिणाम आज आपण बघत आहात.सकाळपासून येवून पोलिसांना शिवीगाळ कोण करत होते हे जिल्ह्याने बघितले आहे. प्रिया शिंदे या अध्यक्ष झाल्या आहेत हे मोठ्या मनानं मान्य करावं. तुमचा पराभव मान्य करा, अशी टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हायव्होल्टेज ड्रामा झाला. यामध्ये भाजपने बाजी मारत अध्यक्षपदी डॉ. प्रिया शिंदे व उपाध्यक्षपदी राजूभैय्या भोसले यांची निवड झाली. यानंतर ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पद्भार स्वीकारला. यावेळी डॉ. प्रिया भोसले व राजूभैय्या भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी खा. रणजितसिह ना. निंबाळकर यांच्यासह जि.प. सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, प्रशासनाचा वापर कोण करतं? प्रशासनाला बेकायदेशीर कामे कोण सांगते? प्रशासन कसे राबवून घ्यायचे असते याचं मुर्तीमंत उदाहरण आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. मी सागांयची आवश्यकता नाही. एक बोट समोर आणि चार बोटं आपल्याकडे असतात याचा विचार त्यांनी केला पाहिजे. मी आजही सांगतो निवडणूक संपलेली आहे. आम्ही महायुतीमधील घटक पक्ष आहे आम्ही सोबत आहोत.
संख्याबळ नसताना तुमची सत्ता कशी? यावर ना. जयकुमार गोरे म्हणाले, संख्याबळ आमच्याकडे होते. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचाच अध्यक्ष होणार अशी आमची पहिल्यापासून भूमिका होती. त्यावर आम्ही ठाम राहिलो. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सुरूवात भाजपाने केली शेवट आम्ही करणार असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना ना. गोरे म्हणाले,जिल्हा परिषदेमध्ये सकाळपासून येवून अधिकाऱ्यांना कोण शिवीगाळ करत होते? कार्यकर्त्याला दमबाजी कोणी केली? जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड असताना त्यांचं येथे काय काम होतं? या सगळ्या गोष्टीची उत्तरे त्यांनी द्यावी. गेल्या 45 दिवसांपासून सदस्य घेवून तुम्ही बाहेर फिरत होता. तरी पण सदस्यांचा विश्वास तुमच्यावर का नव्हता? याचं उत्तर आम्ही नाही द्यायचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे. कोणती नैतिकता जिंकली असेल तर तुम्हाला लख लाभ आहे.