

मेढा : सातारा जिल्ह्यात मी मोठा झालो, तर त्यांचे राजकीय अस्तित्व संपेल, या भीतीने मला जिल्ह्यात मोठे होऊ दिले नाही. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, जावलीची आणि कोरेगावची जनता माझ्यासोबत ठाम असल्यामुळे मी माझे अस्तित्व टिकवू शकलो. आजवरचे नेते माझ्यासोबत नसले, तरी खालची जनता माझ्यासोबत आहे. जावलीचा हा तुमचा वाघ कुणाला नमणार नाही, कायम वाघच राहील, अशा शब्दांत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी आपल्या आगामी रणनीतीचे इरादे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आ. शशिकांत शिंदे यांची निवड झाल्याबद्दल जावलीकरांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस आ. रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव पवार, माजी आमदार सदाशिव सकपाळ, विठ्ठल गोळे, तेजस शिंदे, ऋषीकांत शिंदे, गोपाळ बेलोशे, प्रकाश भोसले, राजेंद्र शेलार, मनोज परामणे, समिंद्रा जाधव, अर्चना देशमुख, मोहन शिंदे, राजकुमार पाटील, मयूर देशमुख, सुरेश पार्टे, आनंदराव जुनघरे, यशवंत फरांदे, बापूराव पार्टे, जयवंत शिंदे, रूपाली भिसे, चंद्रकांत पवार, सुनील फरांदे, राजेंद्र शिंदे, रवींद्र परामणे, प्रकाश परामणे, नारायण शिंगटे, मोहन भिलारे, हणमंत पवार, चंद्रकांत गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, शरद पवार ही माझी ऊर्जा असून जावलीची जनता आजही माझ्यावर तेवढेच प्रेम करते. या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवरून ते दिसून येत आहे. जावलीकरांनी मला प्रचंड प्रेम दिले असून या प्रेमातून उतराई होण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यात मी मोठा होऊ नये म्हणून अनेक वेळा प्रयत्न झाले मात्र हा जावलीचा वाघ कुणाला नमणार नाही. हा वाघ वाघच राहिल. बोंडारवाडी धरणाची आजही विदारक अवस्था आहे. मात्र मी जावळीचा आमदार असतो तर बोंडारवाडी धरण झाल्याशिवाय एक थेंब पाणी खाली जाऊ दिले नसते. टोकाची भूमिका घेणारा मी कार्यकर्ता नाही. मी कोणाला दुश्मन मानत नाही, हे मी माझ्या कामाने आणि कर्तृत्वाने दाखवून देईन, असे सांगून आ. शिंदे म्हणाले, जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यासाठी मी विधानसभेत भांडलो. या सत्काराने मला ऊर्जा मिळणार असून मिळालेलं प्रदेशाध्यक्षपद हा जावली आणि कोरेगावचा सन्मान आहे. संघर्षाच्या काळात शरद पवारसाहेबांनी माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. तुमचा हा सुपुत्र त्या जबाबदारीच सोनं केल्याशिवाय गप्प बसणार नाही.
आ. रोहित पवार म्हणाले, आजची गर्दी बघून जो आदर इथल्या जनतेचा शशिकांत शिंदे यांच्याबद्दल आहे तोच आदर शरद पवार साहेबांचाही आहे. सध्याच्या राजकारणाचा जनतेला किळस वाटायला लागला असून निष्ठा राहिलीच नाही. आज शशिकांत शिंदे तिकडे गेले असते तर मंत्री दिसले असते परंतु जे गेलेत ते जनतेचा विकास करायचा या गोंडस नावाखाली स्वतचा विकास करायला गेले आहेत. निष्ठेचं खरं नाव शशिकांत शिंदे असून या सरकारने शेतकर्यांची आणि लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे. पैसे खाणे एवढेच काम सरकार करत असून ते पैसे निवडणुकीत वापरले जात आहेत. त्यासाठी आपणा सर्वांना संघर्ष करावा लागेल मात्र 2029 साली आघाडीचे सरकार सत्तेत असेल. दरम्यान, प्रारंभी मेढा नगरीतून ढोल ताशाच्या व तुतारीच्या निनादांमध्ये आमदार शशिकांत शिंदे व आमदार रोहित पवार यांची भव्य मिरवणूक काढली. अनेक गावातील ग्रामस्थांनी दोन्ही आमदारांचा श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मेढा व परिसर आ. शशिकांत शिंदे यांच्या माहोलात हरवून गेला होता. यावेळी मेढा पोलीस ठाण्याचे अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
काही लोक म्हणाले, जावलीमध्ये पक्ष शिल्लक नाही. जेवढे लोक पदाधिकारी, कार्यकर्ते बनवले, त्यांना पदे दिली ते सगळे सत्तेच्या पाठीमागे गेले. मात्र, त्यांना घडवणारे होते ते माझ्याबरोबर आहेत. मी 25 टक्के असलेल्या पक्षाचा अध्यक्ष झालो असेल, तर शब्द देतो की 25 टक्केचा हा जावलीचा सुपुत्र 100 टक्के पक्ष केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा विश्वासही आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. मतदारसंघ फुटला नसता, तर महाराष्ट्रात विक्रमी मताने निवडून येण्याचा इतिहास मी केला असता. इतकं प्रेम या सर्व लोकांनी माझ्यावर केले आहे आणि मी कामदेखील केले आहे. माझ्या डोक्यात आमदारकी गेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.