

केळघर : मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस उघडायचे नाव घेत नसल्याने जावलीतील शेतकऱ्यांच्या शेतात व डोळ्यात सध्या पाणी दिसत आहे. जावलीत संततधार पाऊस पडूनही अतिवृष्टीच्या निकषात बसत नाही म्हणून ओला दुष्काळ यादीतून जावलीला वगळण्यात आले आहे. हा येथील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. यावर कोणीच आवाज उठवत नसल्याने जावलीतील शेतकरी पूर्णतः खचला असून हातातोंडाशी आलेले उरले-सुरले भात पीक वाया जाताना दिसत आहे.
मे महिन्यात सुरू झालेल्या पावसाने वरखड जमिनीत योग्य मशागत व वापसा न आल्याने हायब्रीड, सोयाबीन, कडधान्य, भुईमूग, नाचणी इ. पिके पेरताच आली नसल्याने बहुतांश जमिनी पडून आहेत. जून महिन्यात थोडी फार उघडीप मिळाल्यावर भात शेतीत पेरणी करून पुन्हा लागण केली परंतु संततधार पावसाने परत उघडीप दिली नसल्याने व पुरेसा सुर्यप्रकाश न मिळाल्याने भात पिकाच्या वाढीवर परिणाम होऊन त्यावर करपा, तांबेरा पडून पिके पिवळी पडली. केळघर येथील कार्यक्रमात बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी व पंचनाने करून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही संबधीत खात्यातील कुणीही भागात फिरकलेही नाही.
थोडे फार भातपीक पदरात पडेल, या आशेवर शेतकरी होता; परंतु एकीकडे वन्यप्राण्यांचा सुळसुळाट तर वरून पडणारा संततधार पाऊस यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होताना दिसत आहे. जावलीत केळघर, केडंबे, मेढा, वेण्णा दक्षिण विभागात मुख्यतः भात पीक घेतले जाते. या विभागातील डोंगर माथ्यावरील मुऱ्या दऱ्यातील गावामध्ये भात पिके अजून पक्व व्हायचे असून सततच्या पाऊस, धुके व पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने भात पिकावरही रोग पडला आहे.