

कुडाळ : जावली तालुक्यातील विकास सेवा सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने मिळवण्यासाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या चुरशीला आता वेगळेच वळण मिळाले आहे. ३८ सोसायटी संचालक मतदार सहलीवर गेल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगली असून, या सहलीमागे कोणाची राजकीय रणनीती आहे, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यातील रणांगण तापले आहे. विद्यमान जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या माध्यमातून राजकीय फिल्डिंग लावण्यात आल्याची चर्चा असून, मागील निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता यंदा कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंकडून कमालीची खबरदारी घेतली जात असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
मागील जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. त्या एका निर्णायक मताची चर्चा आजही जावलीच्या राजकीय कट्ट्यांवर होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे आपली रणनीती कशी आखतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे.
शशिकांत शिंदे यांची जावली ही जन्मभूमी आणि कधीकाळची कर्मभूमी असल्याने या निवडणुकीत जावलीत आपली राजकीय ताकद पुन्हा सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दुसरीकडे विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यासह भाजपची यंत्रणा आपले गणित अभेद्य ठेवण्यासाठी मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
जावळीत ठिणगी; साताऱ्यात वणवा
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जावळीमध्ये सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता फक्त एका सोसायटीपुरता किंवा दोन नेत्यांपुरता राहिलेला नसून, प्रतिष्ठेच्या राजकारणात रूपांतरित होताना दिसत आहे. एका बाजूला शशिकांत शिंदे यांची जावळीत पुन्हा ताकद आजमावण्याची रणनीती, तर दुसऱ्या बाजूला शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपची मजबूत संघटनात्मक फिल्डिंग, यामुळे जावळीचा राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे.
सोसायट्यांचे ठराव, संचालकांच्या हालचाली, कथित सहली, सोशल मीडिया वॉर आणि प्रत्यक्ष राजकीय भेटीगाठी यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वीच जावळीत राजकीय ‘प्री-क्वार्टर फायनल’ सुरू झाल्याचे चित्र आहे. जावलीत पेटलेली ही राजकीय ठिणगी आता सातारा जिल्ह्यात किती मोठा वनवा पेटवणार? जिल्हा बँकेची सत्ता भाजपच्या हातात येणार की शरद पवार गट या निवडणुकीत जोरदार कमबॅक करणार? आणि जावळीच्या राजकीय रणांगणात नेमका कोणाचा ‘ठराव’ भारी ठरणार? याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.