

कोरेगाव : चिमणगाव, ता. कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्समध्ये उसाचे खोटे वजन दाखवून 1 लाख 5 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वजनकाटा कारकूनासह त्याच्या साथीदार आणि एका ट्रॅक्टर मालकाविरुद्ध कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी दर्शन प्रताप शेडगे (रा. चिमणगाव), रोहन विजय पवार (रा. वाघजाईवाडी) आणि सतीश नारायण चव्हाण (रा. एकंबे) यांच्याविरुद्ध कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप सावंत यांनी याबाबत फिर्याद दिली. कारखान्यातील वजनकाट्यावर दर्शन शेडगे रात्रीच्या पाळीत कारकून म्हणून काम करत होता. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान शेडगे याने नियोजनपूर्वक खोटे वजन दाखवले. जड वजनाची ट्रॉली घेतल्यावर ड्रायव्हर निघताच, शेडगे हा मित्र रोहन पवार याच्या ट्रॅक्टरचा टायर नंबर कॉम्प्युटरमध्ये मॅन्युअली टाकत असे. त्यामुळे प्रत्यक्षात वजनकाट्यावर न आलेल्या ट्रॉलीला आधीच्या जादा वजनाची नोंद लावली जात होती.
हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आला आहे. चौकशीत शेडगे आणि पवार यांनी तोंडी व लेखी कबुली दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या पद्धतीने पाच ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये प्रत्येकी सहा टन, असे एकूण 30 टन खोटे वजन दाखवून कारखान्याची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.