

सातारा : सातारा येथील नियोजित आयटी पार्कसाठी खा. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. नागेवाडी किंवा गोडोली येथील पायाभूत सुविधांचा विचार करून आयटी पार्क सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा. पहिल्या टप्प्यात हे आयटी पार्क गोडोली येथील पशुसंवर्धन खात्याच्या जागेवर व्हावे, अशी मागणी आयटी असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 10 ते 12 वर्षांपासून स्थानिक पातळीवर आयटी सेवा पुरवणार्या कंपन्यांचे आम्ही प्रतिनिधी असून 600 पेक्षा जास्त तरुणांना रोजगार दिला आहे. काही कंपन्या आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील काम करत आहेत. सध्या केंद्र शासनाच्या अनेक योजना उद्योजकांसाठी अनुकूल असल्याने सातारसारख्या शहरांमध्ये आयटी उद्योग वाढीसाठी संधी निर्माण झाल्या आहेत. नागेवाडी आणि गोडोली येथील शासनाच्या जागा यासाठी विचाराधीन आहेत. आयटी पार्क पहिल्या टप्प्यात गोडोली येथील पशुसंवर्धन खात्याच्या जागेवर सुरुवात करावी. दळण-वळण व इतर भौतिक सुविधा तसेच भविष्यात बीपीओ सेंटर झाल्यास रात्रंदिवस कंपन्या चालू शकतात. त्यामुळे महिला कर्मचार्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरालगत आयटी कंपन्यांसाठी जागा असणे गरजेचे आहे. आयटी पार्कमधील जागा फक्त आणि फक्त आयटी उद्योजकांनाच मिळाव्यात व त्यासाठी विशेष अटी व शर्तींचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, ना. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी यांना देण्यात आले आहे. यावेळी प्रशांत यादव, सागर साळुंखे, हर्षद जोशी, संदिप सजगणे, विशाल गायकवाड, रोहित भोळे, अलंकार जाधव उपस्थित होते.
सातारा शहरालगत असलेल्या जागेत आधीच पाणीपुरवठा, वीज, इंटरनेट, चांगले रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांना वेगळा खर्च करावा लागणार नाही. शहरालगत असल्यामुळे महिला कर्मचारी सहजपणे ऑफिसमध्ये ये-जा करु शकतात. आयटी कंपन्यांमध्ये अनेक परदेशी क्लायंट येतात. हायवे आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ असल्याने सातारा शहरात त्यांचा सहज वावर शक्य होईल. आयटी पार्क शहरात असल्यास जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. परिणामी, जिल्ह्याचा आर्थिक विकास होईल, अशा विविध कारणांमुळे गोडोली परिसरात आयटी पार्क असणे महत्वाचे असल्याचे असोसिएशनने निवेदनात म्हटले आहे.