

सातारा : शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवावेत यासाठी सातारा जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे टाकले आहे. जिल्हा परिषदेच्या 135 विद्यार्थ्यांना बेंगलोरच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्त्रो) सफर घडवून आणण्यात येणार आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे झेडपी शाळेचे विद्यार्थी आता इस्त्रोच्या अवकाश तंत्रज्ञानात रमणार आहेत.
सातारा जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमात राज्यासह देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन देण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने अंतराळ सफर ही संकल्पना आणली आहे. या अंतर्गत झेडपी शाळांमधील प्रतिभावंत व गुणवंत विद्यार्थ्यांना बेंगलोर येथील इस्त्रोच्या सहलीचा अनुभव घेता येणार आहे. महाराष्ट्रात एकीकडे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या कमी होवून त्या बंद पडू लागल्या आहेत. मात्र साताऱ्यात याउलट चित्र आहे. विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून झेडपी शाळा सुरुच ठेवण्यासाठी नव्हे तर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालता यावी. यासाठी विविध प्रकल्पही राबवत आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त व डिजिटल पध्दतीमध्ये शिक्षण शिकवले जात आहे. नवनवीन उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले विद्यार्थी नाव कमवत आहेत.
बेंगलोर येथील इस्त्रोच्या सहलीसाठी सातारा जिल्ह्यातील शाळांमधून सुमारे 135 विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे निवड केली आहे. त्यामध्ये 8 शिक्षक व 2 अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिली. इस्त्रोच्या सहलीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अवकाश क्षेत्रातील माहिती मिळण्यास मदत होणार आहे. त्यांच्या भावी आयुष्यात शास्त्रज्ञ व अवकाश संशोधन क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी कशा त्यांना मिळतील यासाठी शिक्षण विभागाचा हा प्रयत्न आहे. इस्त्रोच्या सहलीची प्रेरणा घेवून विद्यार्थी जिल्ह्याचे नाव अवकाश क्षेत्रात उज्वल करतील.