

सातारा : इस्रायल अणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे युद्ध भडकले आहे. या युद्धामुळे दुबईत अडकलेल्या 30 पैकी 20 जणांचा भारतात परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यांना भारतातील विविध विमानतळांवर आणण्यात येणार आहे. उर्वरित दहा जणांनाही लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. संबंधित नागरिकांच्या संपर्कात जिल्हा प्रशासन असून त्यांना आवश्यक मदत करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील हे परिस्थितीवर लक्ष ठेवून त्यांनी यंत्रणांना सूचना केल्या आहेत.
दुबईत पर्यटन आणि वैयक्तिक कारणासाठी 30 जण गेले होते. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे अचानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, आंतरराष्ट्रीय हवाई सेवा तसेच वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. परदेशात गेलेल्या नागरिकांना मायदेशी परतण्यास अडचणी निर्माण झाल्या. विविध करणांसाठी मध्यपूर्वी आशियात गेलेल्या नागरिकांना सुखरूप भारतात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले. जिल्हा प्रशासनाने संबंधित नागरिकांची माहिती घेऊन जिल्ह्यातील त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांमध्ये सातारा जिल्ह्यातील 30 जणांचा समावेश आहे. यातील काही पर्यटकांची दुबईतील एका हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील पर्यटकांना पुन्हा आपल्या मायदेशी सुखरूप आणण्यासाठी जिल्हा प्रशासन हे राज्य शासनाच्या व संबंधितांच्या नातेवाईकांच्या सतत संपर्कात होते. परदेशात अडकलेले नागरिक सुखरुप असल्याने त्यांच्या नातेवाईकांना धीर आला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
राज्य शासनाकडून परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासाशीही संपर्क साधण्यात आला असल्याचे कळते. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर किंवा सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्यामुळे संबंधित पर्यटकांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया बुधवारी सुरु झाली. त्यामुळे संबंधित पर्यटकांच्या चिंतेत असणाऱ्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात गुरूवारी 20 जणांना भारतात आणण्यात येणार आहे. जशी व्यवस्था होईल तसतसे उर्वरित 10 नागरिकांनाही भारतात आणण्यात येणार आहे. मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात आणि भारतीय दुतावासाशी संपर्क ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित पर्यटकांचे नातेवाईक राज्याच्या आपत्कालीन केंद्राशी संपर्क साधू शकतात. परदेशात अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी सातारा जिल्हा प्रशासन नियंत्रण कक्षाच्या (02162) 232175, 233833 किंवा मंत्रालयीन नियंत्रण कक्षाच्या 9321590561 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.