

सातारा : महाराष्ट्र, कर्नाटक राज्याच्या सीमाभागामध्ये चोरी करणार्या तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्येही दीडशेहून अधिक वाहने चोरणार्या अट्टल वाहन चोरट्याला सातारा शहर पोलिसांनी वाढे फाटा येथे पेट्रोलिंग करताना पकडले. त्याच्याकडून सात चारचाकी, चार दुचाकी आणि सहा चारचाकी वाहनांच्या चेसी प्लेट असे 73 लाखांचे घबाड पोलिसांनी हस्तगत केले आहे.
नागेश हनुमंत शिंदे (वय 31, रा. कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. सातारा शहर परिसरातील वाढत्या वाहन चोरींच्या घटना उघडकीस आणण्याबाबत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शाम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, सुजित भोसले, नीलेश जाधव, नीलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, तुषार भोसले, संतोष घाडगे, सचिन रिठे यांच्या पथकाने शहर परिसरात पेट्रोलिंग सुरु ठेवले आहे.
दोन दिवसांपूर्वी सातारा शहर पोलीस वाढे फाटा परिसरात पेट्रोलिंग करत असताना अट्टल वाहनचोर नागेश शिंदे हा मास्क लावून दुचाकीवरुन संशयास्पपदरीत्या फिरत होता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तसेच कागदपत्रांची विचारपूस केली. तेव्हा त्याने गाडीची कागदपत्रे नसल्याचे सांगितले. या चौकशीमध्ये त्याने कर्नाटकसह विविध ठिकाणाहून गेल्या चार महिन्यात 30 च्यावर चारचाकी वाहने चोरल्याचे कबूल केले. नागेश शिंदे याच्या काही ठिकाणांची पोलिसांनी झडती घेतली असता चारचाकी वाहनांच्या चेसी प्लेट मिळाल्या. सातारा शहर पोलिसांनी पहिल्या टप्प्यात त्याच्याकडून सात चारचाकी आणि चार मोटरसायकल आणि चेसी प्लेट हस्तगत केल्या आहेत.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाने ही कारवाई केली.