Mandesh Migratory birds: माणदेशात स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी

‘एशियन वॉटरबर्ड सेन्सस‌’ अंतर्गत युद्धपातळीवर सर्वेक्षण
Mandesh Migratory birds
Mandesh Migratory birdsPudhari Photo
Published on
Updated on

दहिवडी : सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी ओळख असलेल्या माणदेशात सध्या कडाक्याच्या थंडीसोबतच युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया आणि हिमालयातून हजारो किलोमीटरचा प्रवास करुन विविध दुर्मिळ प्रजातींचे स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‌‘एशियन वॉटरबर्ड सेन्सस 2025‌’या जागतिक उपक्रमांतर्गत पक्षी सर्वेक्षणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

माण आणि खटाव तालुक्यांतील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पक्षीजैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी स्थानिक पक्षी तज्ज्ञ एकत्र आले आहेत. माणचे वन्यजीव संवर्धक व पक्षी अभ्यासक चिन्मय सावंत आणि खटावचे पक्षी अभ्यासक डॉ. प्रवीण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वेक्षण सुरू आहे. या मोहिमेंतर्गत माण व खटाव तालुक्यांतील पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या तब्बल 25 प्रमुख ठिकाणांची (हॉटस्पॉट्स) निवड करण्यात आली असून, तेथील पक्ष्यांच्या प्रजाती व त्यांच्या संख्येची शास्त्रीय नोंद घेतली जात आहे. या उपक्रमात दोन्ही तालुक्यांतील पाणथळ जागा तसेच नैसर्गिक माळरानांच्या अधिवासांचा समावेश करण्यात आला आहे.

किरकसाल-नळीचे माळ, डांबी डोंगररांग, पिंगळी तलाव, वाघजाई तलाव, वडजल-ढाकणी तलाव, आंधळी धरण, राजेवाडी धरण, राणंद तलाव, लोधवडे तलाव, गोंदवले खुर्द तलाव. खटाव तालुक्यातील येरळवाडी-मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र, सूर्याचीवाडी तलाव, धोंडेवाडी तलाव, पेडगाव तलाव, तारकेश्वर (वडूज), दर्जाई तलाव, येरळा नदी पात्र परिसर. या हॉटस्पॉट्सवरून गोळा करण्यात आलेली सर्व निरीक्षणे जागतिक स्तरावर प्रतिष्ठित असलेल्या ‌‘ई-बर्ड‌’ या संकेतस्थळावर अपलोड केली जात आहेत. यामुळे माणदेशातील कोणत्या तलावावर कोणत्या प्रजातींचे पक्षी येतात, त्यांची संख्या किती आहे आणि त्यांच्या अधिवासाची सद्यस्थिती काय आहे, याचा शास्त्रीय डेटाबेस तयार होत आहे.

सध्या माणदेशातील हे 25 हॉटस्पॉट्स विदेशी पक्ष्यांच्या आगमनाने गजबजून गेले असून, पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरत आहे. या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन पक्षीनोंदी कराव्यात, असे आवाहन पक्षी अभ्यासकांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news