

सातारा : डिझेल पुरवठ्यावरील निर्बंधांबाबत हस्तक्षेप करून औद्योगिक क्षेत्रातील वापरकर्त्यांना सुरळीत डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा उद्योग बंद होतील, अशी मागणी साताऱ्यातील उद्योजकांनी ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली. यावर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक लावून प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही शिवेंद्रराजे यांनी उद्योजकांना दिली.
केंद्राने औद्योगिक वापरासाठी २०० लिटर डिझेल खरेदीचे बंधन घातल्याचे वृत्त प्रसिद्ध करून जिल्ह्यातील उद्योजकांच्या भावना मांडल्या होत्या. डिझेल खरेदीचे बंधन घातल्याने कंपन्या बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच कंपन्या शिफ्टमध्ये सुरू करण्याची वेळ येऊ शकते. त्याचा परिणाम रोजगार आणि उत्पादनावरही होण्याची भीती आहे. यासाठी हा निर्णय रद्द करावा अन्यथा यावर पर्यायी उपाययोजना करण्यासाठी उद्योजकांनी शिवेंद्रराजेंची भेट घेत गार्हाणे मांडले.
यावर शिवेंद्रराजे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना फोन करून स्थानिक पातळीवर काय अंमलबजावणी करता येईल, हे पाहावे. जिल्ह्यातील कोणताही उद्योग डिझेल अभावी बंद पडू नये, याबाबत कार्यवाही करावी, असे सांगितले.
यावेळी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ साताराचे (मास) अध्यक्ष धैर्यशील भोसले, कूपरचे सर्वेसर्वा फरोख कूपर, सचिव राहुल शिंदे, टॉप गेअरचे श्रीकांत पवार, नितीन तरडे, केदार साखरे, सौरभ पवार, आदित्य आहेरराव उपस्थित होते.