

खेड : सातारा शहराच्या हद्दवाढीनंतरही पुणे- बंगळूर महामार्गाच्या पूर्वेकडील भाग त्रिशंकू भागातच मोडत आहेत. या भागातील नागरिकांना अनेक नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या भागाचा खेड ग्रामपंचायतीत समावेश करावा, असा ठराव ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत करण्यात आला. तसेच महावितरण कंपनीच्या स्मार्ट, प्रीपेड मीटर बसवण्याच्या सक्तीला ग्रामस्थांनी विरोध करत आधीच्या मीटरमध्ये कोणताही बदल करू नये, अशी मागणी केली.
सरपंच लता फरांदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस उपसरपंच सुधीर काकडे, सदस्य शामराव कोळपे, कांतीलाल कांबळे, विनोद माने, संतोष शिंदे, निखील यादव, चंद्रभागा माने, प्रियांका सपकाळ, वंदना गायकवाड, सुमन गंगणे, सुषमा लोखंडे , स्मिता शिंदे, सुशिला कांबळे, शोभा फडतरे, दिपाली चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सातारा पालिकेच्या हद्दवाढीनंतरही महामार्गाच्या पूर्वेकडील भागास सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी मांडल्या.
त्यानुसार गोडोली सं.नं. 21, 22 ,23 मधील पूर्वेकडील अशंत: भाग, 42,43 अशंत: भागात असलेला बॉम्बेरेस्टॉरंट, विसावा जलशुद्धीकरण परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, देशमुखनगर, अपेक्स हॉस्पिटल परिसर, म्हावसे पेट्रोल पंप, कणसे, जॉनडिअर शोरूम आदी महामार्गाच्या पूर्वेकडील भागाचा खेड ग्रामपंचायतीमध्ये समावेश करावा, अशी मागणी करणारा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी हात उंचावून मान्यता, पाठिंबा दिला.
ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांच्या निवासस्थानामध्ये महावितरण कंपनीने स्मार्ट, प्रीपेड मीटर बसवण्याच्या निर्णयाला विरोध केला. आधीच्या मीटर मध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये, असाही निर्णय घेण्यात आला. या सभेस संजय गायकवाड, विशाल शिंगटे, गणेश पालखे, भिमराव लोखंडे, मिलिंद गुरवे, नितीन शिंदे, सुरज कोळपे, उषा पाटील, रशिदा शेख तसेच त्रिशंकू भागातील नागरिक उपस्थित होते.