

सातारा : सातारा शहरालगत असलेल्या कोडोली ग्रामपंचायत हद्दीतील देगाव फाटा ते नवीन एमआयडीसीकडे जाणार्या रस्त्यालगतच्या काही दुकानांमधून बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर विक्री सुरू आहे. हे विक्रेते छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरून जादा किमतीमध्ये विकत आहेत. गॅस भरताना स्फोटासारखे प्रसंग घडण्याची शक्यता असल्याने संबंधित दुकानदार व व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
नुकतचे धारावी मुंबई येथे घरगुती वापराच्या 10 ते 12 सिलेंडरचा स्फोट होऊन नागरिकांच्या घराचे व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सातारा शहरालगत असलेल्या कोडोली ग्रामपंचायत हद्दीतील देगाव फाटा ते नवीन एम.आय.डी. सी.कडे जाणार्या रस्त्या लगतच्या काही दुकान मालकांकडून वर्दळींच्या रस्त्यात सिलेंडर ठेवून कोणतीही परवानगी नसताना सिलेंडरची विक्री केली जात आहे. प्रत्यक्ष सिलेंडरचा दर 820 रुपये असताना हे दुकानदार 1 हजार ते 1 हजार 200 रुपयांला विकत आहेत. विविध कंपनीचे वाहनचालक व दुकानदारांची मिलीभगत असल्याने बेकायदेशीरपणे सिलेंडरचा साठा करुन तो विकत आहेत. हे वाहनचालक दुकानदारांना 820 रुपयांचा सिलेंडर 920 ते 950 रुपयाला विकत आहेत. काही दुकानदार मोठ्या सिलेेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरुन तो जादा किंमतीत विकत आहेत. त्यामुळे एमआयडीसी व परिसरातील कामगारही जादा पैसे देवून सिलेंडर घेताना दिसत आहेत. काही दुकानदार दुकानात किंवा घरात मोठ्या सिलेंडर मधून गॅस छोट्या सिलेंडरमध्ये दररोज भरत असतात. त्यामुळे अपघातासारखे प्रसंग घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुकानदार पैशासाठी स्थानिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. याबाबत ग्रामपंचायत, पोलिस, पुरवठा विभागाने कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.