

सातारा : सातार्यातील यादोगोपाळ पेठेत विवाहित महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर तिचा पती झटापटीत बेशुध्द झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. संशयित पती दुसर्या दिवशी शुध्दीवर आला असून पोलिसांचा त्याच्यावर पहारा ठेवण्यात आला आहे. दरम्यान, विवाहितेच्या नेमक्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे.
सौ. अजंली शिंदे (वय 29) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणी पती राजेंद्र शिंदे याच्याविरुध्द अजंलीचा भाऊ श्रेयस पाटील (रा. करंजे) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सौ. अजंली शिंदे यांचा राहत्या घरामध्ये कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही घटना शुक्रवारी रात्री समोर आल्यानंतर सातार्यात खळबळ उडाली. अंजली यांच्या मुलीला मृतदेह दिसल्यानंतर ती भेदरुन गेली आहे.
अजंली व तिच्या पतीमध्ये वादविवाद होते. तो पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. यातूनच त्याने बरेवाईट केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मृतदेहाचे सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मात्र मृत्यूचे नेमके कारण समोर आले नाही. संशयित राजेंद्र शिंदे हा मेहुण्यासोबत झालेल्या झटापटीत बेशुध्द झाल्याने त्याच्यावर सिव्हीलमध्ये उपचार सुरु आहेत. रविवारी रात्री उशिरा तो शुध्दीत आला. मात्र बोलण्याच्या मनस्थितीमध्ये तो नव्हता.
यामुळे आज पोलिस त्याचा जबाब घेणार आहेत. तोपर्यंत उपचार होईपर्यंत पोलिसांचा शिंदे याच्यावर वॉच राहणार आहे. दरम्यान, मृत्यूचे कारण नेमके समोर न आल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्याचा अहवाल कधी येणार? तोपर्यंत पोलिस राजेंद्र शिंदे याचे काय करणार? याकडे लक्ष लागले आहे.