

सातारा : उन्हाळी सुट्टी संपत आली असून नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागली आहे. सध्या पारंपरिक शिक्षणाच्या पदवी अभ्यासक्रम, अकरावीसह विविध इयत्तांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. त्यामुळे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सीईटी निकालाचे वेध लागले आहेत. जून महिना सुरु झाला तरी सीईटीचा निकाल न लागल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश यावर्षीदेखील लांबणार की काय? असा सवाल विद्यार्थी व पालकांना सतावत आहे. दि. 15 जूनच्या आसपास हा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पारंपरिक शिक्षणापेक्षा करिअर ओरिएंटेड शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळेच बहुतांश विद्यार्थी बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यामुळे बोर्ड परीक्षेच्या निकालानंतर काहीच दिवसांमध्ये सीईटी, नीट परीक्षेचे निकालही लागतात. दहावी, बारावीचे निकाल लागले असल्याने अकरावीची तसेच पारंपरिक शिक्षणातील पदवी भाग एकची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
जून महिना उजाडल्याने नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेवू इच्छिणार्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही सीईटी निकालांचे वेध लागले आहेत. कृषी, अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्रासह विविध बहुतांश व्यवसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेवून त्यातील गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जातात. त्यामुळे सीईटी निकाल लागल्याशिवाय उच्च शिक्षणाची कवाडे खुली होणार नाहीत. मागील काही वर्षांपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक विस्कटलेे होते.
ते सुरळीत होवून नवीन शैक्षणिक धोरणाची काटेकोर अंमलबजावणीसाठी गतवर्षापासून बोर्ड परीक्षांचे निकाल लवकरच लावण्यासाठी परीक्षा मंडळ कसरत करत आहे. यावर्षीदेखील दि. 5 मे रोजी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला असून सुमारे एक महिना होत आला तरी एमएचटी सीईटीसह विविध प्रवेश परीक्षांचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यास विलंब झाला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडणार की काय? असा सवाल विद्यार्थी व पालकांना सतावत आहे.
दहावी उत्तीर्णांसाठी अकरावी बारावी अभ्यासक्रम किंवा पदविका अभ्यासक्रम असे दोन पर्याय प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यातच सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या वाढत असल्याने पदवी व पदविका उत्तीर्ण दोन्ही उमेदवार एकाच नोकरीसाठी इच्छुक असतात. या पार्श्वभूमीवर आयटीआय, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. अशात प्रवेश परीक्षांचे निकाल रखडल्याने पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेवरही होण्याचा धोका संभवतो.