

सातारा : गणेश चतुर्थी ते अनंत चतुदर्शी असा अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र प्रत्येक कुटुंबाच्या परंपरांनुसार बाप्पांचे विसर्जन केले जाते. मंगळवारी गौरींबरोबर जिल्ह्यातील सात दिवसांच्या 30 हजार 262 घरगुती, तर 226 सार्वजनिक बाप्पांचे भक्तिमय वातावरणात व ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने जलप्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार सातारा शहरासह ग्रामीण भागातही कृत्रिम तलावात विसर्जनाला बहुतांश गणेश भक्तांनी प्राधान्य दिले.
घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव अकरा दिवसांचा असला, तरी प्रत्येक कुटुंबाची उत्सवाची परंपरा वेगवेगळी असते. दीड दिवसापासून पाच, सात दिवसांचाही उत्सव साजरा करण्यात येत आहे. तसेच गौरी विसर्जनाबरोबर गणेश विसर्जनही केले जाते. यावर्षी गौरी आवाहन पाचव्या दिवशी झाल्यामुळे गौरींबरोबर जिल्ह्यातील 30 हजार 262 घरगुती बाप्पांचे विसर्जन सातव्या दिवशी करण्यात आले.
सातारा शहरात नगरपालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी राजवाड्यावरील पोहण्याचा तलाव, बुधवार नाका, हुतात्मा स्मारक, दगडीशाळा- सदरबझार, तसेच गोडोली आयुर्वेदिक उद्यानाजवळ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्वच ठिकाणी तसेच ग्रामीण भागातील कृत्रिम तळी, विहिरींवर सात दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी गर्दी झाली होती. तसेच शहर परिसरातील संगम माहुली, वेण्णा पुलानजीक व वाढे फाटा परिसरातील नदीकाठांवर एक दोन तीन चार.. गणपतीचा जयजयकार, अर्धा लाडू फुटला गणपती आमचा उठला, गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयजयकारांत घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यात एकूण 30 हजार 262 घरगुती व 226 सार्वजनिक बाप्पांना भक्तिभावाने पूजा, आरती करून निरोप देण्यात आला. यामध्ये मंगळवारी सातारा शहरातील 3 हजार 184 , शाहूपुरी परिसरातील 1 हजार 500 घरगुती, तर सार्वजनिक बाप्पांमध्ये सातारा शहरातील 25 मूर्तींचा समावेश आहे. विसर्जनस्थळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पालिका प्रशासनाकडूनही प्रत्येक कृत्रिम तळ्याजवळ आरोग्य पथके तैनात करून खबरदारी घेण्यात आली होती.