Mahabaleshwar Monsoon Tourism : सुट्ट्यांनी महाबळेश्‍वरच्‍या वर्षा पर्यटनाला बहर

पर्यटकांची तोबा गर्दी; लिंगमळासह वेण्णा लेक दाट धुक्यात हरवला
Mahabaleshwar Monsoon Tourism : सुट्ट्यांनी महाबळेश्‍वरच्‍या वर्षा पर्यटनाला बहर
Published on
Updated on

महाबळेश्‍वर : वीकेंडला स्वातंत्र्यदिनाची जोड मिळाल्याने सलग सुट्ट्यांचा मुहूर्त साधत राज्यासह परराज्यातील हजारो पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. दाट धुके, हिरव्यागार डोंगररांगा, अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी आणि सुखावणारा गारवा यामुळे महाबळेश्वरचे वर्षा पर्यटन बहरले आहे. अनेक दिवसांनंतर सूर्यदर्शन झाल्याने वातावरणातही प्रसन्नता पसरली आहे. महाबळेश्वरच्या निसर्गसौंदर्याचा पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला.

पावसाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्‍वरमध्ये यंदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. १ जून ते १६ ऑगस्टपर्यंत ५५५१.२ मिमी (२१८.५५ इंच) पावसाची नोंद झाली आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आता काहीशी उसंत घेतली असून अधूनमधून रिमझिम सरींसह सूर्यदर्शन होत आहे. त्यामुळे धुक्याने वेढलेल्या हिरव्यागार डोंगररांगा आणि ओसंडून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची पावले महाबळेश्वरकडे वळली आहेत.

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले लिंगमळा धबधबा, केटस्‌ पॉईंट, लॉडविक पॉईंट, मेटगुताड येथील मिनी भुशी डॅम परिसर, प्रतापगड, हस्तकला केंद्र आदी स्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत.

महाबळेश्‍वरच्या वर्षा पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेला लिंगमळा धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे. दाट धुक्याच्या चादरीत उंचावरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मेटगुताड येथील मिनी भुशी डॅम परिसरातही पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात पर्यटकांची गर्दी झाली आहे.

खड्ड्यांची वरात महाबळेश्वरच्या दारात

एकीकडे वर्षा पर्यटन बहरले असताना दुसरीकडे महाबळेश्‍वर परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या कायम आहे. महाबळेश्‍वर-पाचगणी मुख्य रस्ता अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये गेला असून या रस्त्यावरून खड्ड्यांतून मार्ग काढताना पर्यटकांसह स्थानिक वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. केवळ दिखाव्यासाठी होणारी डागडुजी आणि त्यानंतर पुन्हा निर्माण होणारे खड्डे यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. पर्यटनाच्या ऐन हंगामात या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news