Koyna Dam : कोयनेच्या पाण्यावर किल्ल्यांचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, शूरगाथा, पराक्रम लेझर शोद्वारे झळकला
Koyna Dam |
कोयनानगर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर युनेस्को जागतिक वारसा हक्कात समावेश झालेल्या बारा गड-किल्ल्यांचा इतिहास कोयना धरणाच्या पाण्यावर लेझर शोच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

पाटण : महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणाने राज्यासह इतर राज्यांचीही तहान भागवत महाराष्ट्राला प्रकाश दिला. त्याच कोयना धरणाच्या पाण्यावर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सध्या जागतिक वारसा हक्क यादीत समाविष्ट केलेल्या बारा गड किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास लेझर शोच्या माध्यमातून अवतरला आहे. महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, शूरगाथा, पराक्रम याची माहिती देणारा हा लेझर शो सध्या तालुका, जिल्हा, राज्यात नव्हे तर अगदी परराज्यातही नावाजला जात आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी जगभरात याचा नावलौकिक सुरू असल्याने निश्चितच कोयनेचे महत्त्व वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहेत. युनोस्कोच्या जागतिक वारसा हक्कात भारताच्या बारा गड किल्ल्यांच्या समावेश करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर कोयना धरण व्यवस्थापनाकडून याचे महत्त्व नव्या पिढीला छत्रपतींचा इतिहास समजण्यासाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त कोयना धरणाच्या सहा वक्री दरवाजातून पाणी सोडल्यानंतर दिसणार्‍या विहंगम दृष्यावर रात्रीच्या वेळी लेझर शोच्या माध्यमातून बारा गडकिल्ल्यांचे सादरीकरण सुरू केले आहे.

सातारा जिल्हा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, कार्यकारी अभियंता महेश रासणकर, उपकार्यकारी अभियंता आशिष जाधव यांच्यासह त्यांच्या टीमकडून ही संकल्पना व अथक परिश्रमातून हा भव्य दिव्य देखावा आयोजित करण्यात आला आहे. याची स्क्रिप्ट प्रशांत कुबेर यांनी लिहिली असून याला आवाजही त्यांचाच आहे. ड्रीम पॉईंट पुणे यांचा लेझर शो व साऊंड सिस्टिम वापरण्यात आले असून हा शो सर्वांसाठी खुला ठेवण्यात आलेला आहे. बारा गड किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ ’शिवनेरी’ शिवछत्रपतींच्या प्रत्येक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार असणारा किल्ले ’राजगड’ तर अफजल खान वधासह शिवछत्रपतींचा धाक निर्माण करणारा किल्ले ’प्रतापगड’, ’पन्हाळा’ चा महिमा सर्वज्ञात आहेच. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण बुरुजांचा व सुरत लुटीतला खजाना सुरक्षित ठेवण्यासाठी वापरण्यात आलेला ’लोहगड’, महाराष्ट्र गुजरात सीमेवर सर्वात उंच किल्ला असणारा ’साल्हेर’ चा किल्ला तर समुद्रावर राज्य करण्यासाठी सर्वोत्तम महाकिल्ला ’खांदेरी’म्हणून ओळखला जातो.

तळ कोकणातील किल्ला जमिनीशी संपर्क नसलेला व छत्रपतींच्या हातापायाचे ठसे पाहायला मिळतात असा किल्ला ’सिंधुदुर्ग’, सागराच्या तळाशी दगडी भिंती तिन्ही बाजूंनी समुद्र आणि समुद्राद्वारे हल्ले करण्यासाठी प्रसिद्ध असणारा किल्ले ’विजयदुर्ग’ तर सर्वात बळकट व ऐतिहासिक सागरी महत्त्व असलेला किल्ले ’सुवर्णदुर्ग’ यासह छत्रपतींची दूरदृष्टी असणारा व स्वराज्यावर कोणतेही संकट आल्यानंतर भौगोलिक व राजकीय दृष्ट्या सक्षम असणारा किल्ले ’जींजी’ तर स्वराज्याची गर्जना व रशिवछत्रपतींचा राज्याभिषेक झालेला किल्ले ’रायगड’ अशा बारा गड किल्ल्यांचा इतिहास येथे कोयनेच्या पाण्यावर अवतरला आहे.

कोयनेवर वर्षभर लेझर शो दाखवा...

पर्यटनाच्या दृष्टीने कोयनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्थानिक नैसर्गिक साधन संपत्ती, कोयना धरणासह अनेक धबधबे, पर्यावरण पूरक प्रकल्प, बोटिंग या सर्वांना काही मर्यादा आहेत. मात्र जर कोयना धरण दरवाजातून पाणी सोडून वर्षभर असा लेझर शो दाखवला गेला तर निश्चितच पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरेल. यातून कोयनेला पर्यटकांचे वर्षभर ये- जा सुरू राहील आणि यातून स्थानिकांना रोजगार, व्यवसाय व उदरनिर्वाहाची साधनेही उपलब्ध होतील. जर उदंचन पद्धतीने त्या पाण्याचा वापर होत रात्रीच्या वेळी पाणी खाली व पुन्हा ते वर उचलून धरणात टाकले तर पाण्याचा अपव्यय टळेल आणि पर्यटनाची संधी उपलब्ध होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news