

सणबूर : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद - पाटण पंचायत समिती निवडणुकीचा निकाल हा केवळ शिवसेनेचा विजय नाही, तर तो राजकीय परिपक्वतेचा, स्वाभिमानाचा आणि विकासाभिमुख नेतृत्वावरील अखंड विश्वासाचा ठोस पुरावा आहे. सातपैकी तब्बल सहा जिल्हा परिषद जागा आणि चौदापैकी तेरा पंचायत समिती जागा विक्रमी मताधिक्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटणमध्ये आपले नेतृत्व निर्विवाद असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विरोधकांकडून दिग्गजांच्या नातेवाईकांना रिंगणात उतरविण्यात आले असले तरी सामान्य जनता विकासकामांच्याच पाठिशी ठामपणे उभी राहिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पाटण तालुक्यात हायव्होल्टेज लढतीत शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला होता. एका बाजूला भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती. वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. चित्रा वाघ यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या सभा पाटण तालुक्यात घेतल्या गेल्या. आरोपांची मालिका, वैयक्तिक टीका, वातावरण तापवण्याचे प्रयत्न असे सर्व काही करण्यात आले. उद्दिष्ट एकच होते, ना. शंभूराज देसाई यांना चारी बाजूंनी घेरायचे आणि त्यांची घोडदौड रोखायची.
मात्र या सगळ्या गदारोळात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका क्षणभरही ढळू दिली नाही. त्यांनी सुरुवातीपासून एकच भूमिका मांडली-वैयक्तिक टीका करू नका, विकासावर बोला. विकासात कमी पडलो असेल तर जनता मला स्वीकारणार नाही. हा आत्मविश्वास घोषणेतून नव्हे, तर कामातून आलेला होता. विरोधकांनी आसूड ओढले, परंतु ना.देसाई यांनी उत्तर दिले ते संयमाने आणि ठोस कामांच्या आधारे.
या निवडणुकीत ना.देसाई यांनी भावनिक लाट उभी करण्याचा प्रयत्न केला नाही; त्यांनी सूक्ष्म नियोजनावर भर दिला. बूथनिहाय, गावनिहाय आणि मतदारनिहाय रणनीती आखली गेली. कार्यकर्त्यांना स्पष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या. गेल्या सहा महिन्यांत भाजपमधून शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचे प्रवेश घडवून आणत त्यांनी राजकीय समीकरणे बदलली. संघटन भक्कम केले, कार्यकर्त्यांना सन्मान दिला आणि प्रत्येक गावात विकासाचा अहवाल पोहोचवला. त्यामुळे निवडणूक जड गेली नाही; ती सुयोग्य नियोजनामुळे सुकर झाली. या लढतीला प्रतिष्ठेचे स्वरूप आले होते.
माथाडी नेते तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील मंद्रुळकोळे गटातून मैदानात होत्या त्यांच्या विरोधात आवघ्या बावीस वर्षाच्या मुलीने लढत दिली. तसेच केंद्रीय खणिकर्म महामंडळाचे सदस्य ना. भरत पाटील यांच्या पत्नी प्राजक्ता पाटील काळगाव गटातून नशीब आजमावत होत्या. तर दुसरीकडे सणबूर गणातुन संदिप जाधव यांच्या पत्नी संपदा जाधव यांनी जोरदार लढत देत प्रस्थापितांना दणका दिला, म्हणजेच विरोधकांनी प्रभावी चेहरे उतरवले होते.
पण पाटणच्या मतदारांनी नावाला नव्हे, तर कामाला मत दिले. ना. शंभूराज देसाई यांच्या झंझावाती प्रचारासमोर आणि कामांच्या भक्कम आधारासमोर हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तालुक्यात रस्त्यांची उभारणी, शाळांच्या नवीन खोल्या, वीज पुरवठ्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याच्या योजना, पुनर्वसनाचे प्रश्न, महिलांसाठी राबवलेली ‘लाडकी बहीण’ योजना, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम-ही सर्व कामे केवळ कागदावर नव्हती, तर प्रत्यक्षात उतरलेली होती. आठवड्याला घेतला जाणारा ‘जनता दरबार’ हा सामान्य माणसाच्या अडचणी थेट सोडवणारा प्रभावी मंच ठरला.
पालकमंत्री आपल्या दारी ही अभिनव संकल्पना लोकांशी थेट संवाद साधणारी ठरली. त्यामुळे जनतेला वाटले की हा नेता दूर बसून आदेश देत नाही, तो आपल्या सुखदुःखात सहभागी होतो. या निवडणुकीत देसाई यांनी अनेक ठिकाणी सामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी दिली आणि घराणेशाहीच्या राजकारणाला छेद दिला. मतदारांनीही त्याच भावनेला प्रतिसाद दिला. काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहायचे हा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. विरोधकांच्या सभांमध्ये झालेल्या वैयक्तिक टीका उलट जनतेच्या जिव्हारी लागल्या.
बाहेरून येऊन तालुक्याचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांना पाटणच्या स्वाभिमानी जनतेने मतपेटीतूनच उत्तर दिले संघटनशक्ती, संयम, सातत्यपूर्ण विकास आणि जनतेशी जिव्हाळ्याचे नाते या चौकटीत उभे राहिलेले नेतृत्व कितीही दबाव आला, तरी पराभूत होत नाही, हे पाटणने दाखवून दिले. विरोधकांची फौज, मोठ्या सभा, प्रचाराची धामधूम या सगळ्यावर मात करत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एकहाती सत्ता काबीज केली असून त्यांचे राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत.