

पाटण : नैसर्गिक, कृत्रिम तसेच तांत्रिक नवनवीन विक्रम नोंदवणाऱ्या कोयना धरणातील पाण्यावर सन २०२५/२६ या जलवर्षात कोयना धरण पायथा वीजगृहातून सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यावर प्रकल्प निर्मितीनंतरची सर्वात मोठी अशी ४७.६३ टीएमसी पाण्यावर तब्बल २१६.४६६ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्याचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणातील एकूण पाण्यापैकी ६७.५० टीएमसी पाणी हे पश्चिमेकडेल पोफळी, कोयना चौथा टप्पा, अलोरे या तीन प्रकल्पांसाठी आरक्षित असते तर पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. वास्तविक पश्चिमेकडे सोडण्यात येणारे पाणी वीजनिर्मिती केल्यानंतर चिपळूण तालुक्यातील वशिष्ठी नदीमार्गे समुद्राला जाऊन मिळत असल्याने त्याचा सिंचनासाठी काहीच फायदा होत नाही. याउलट पूर्वेकडे सोडण्यात येणारे पाणी एका बाजूला वीज निर्मिती तर करतेच शिवाय त्यापुढे पाटण, कराड, सांगली ते अगदी कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांच्या सिंचनाची गरज भागवते ही जमेची बाजू आहे.
पश्चिमेकडील प्रकल्पात पाणीवापर ज्यादा दाबाने होत असल्याने तेथून जास्त वीजनिर्मिती होते तर पूर्वेकडे पाण्याचा दाब कमी असल्यामुळे येथून तुलनात्मक वीजनिर्मिती कमी होते या तांत्रिक बाबीही आहेत. कोयना धरण पायथा वीजगृह वीजनिर्मिती प्रकल्प निर्मितीनंतर सर्वाधिक जलविद्युत निर्मिती करण्याचा मान मिळाल्याने निश्चितच कौतुकाची बाब आहे. धरण निर्मितीनंतर सिंचनासाठी पहिल्यांदाच पाणी बंद करण्याची वेळ यावेळी व्यवस्थापनावर आली. याशिवाय मागील २०२५/२६ या जलवर्षात अधिक काळ पाऊस झाल्याने त्याचपटीत पाणीसाठाही मुबलक प्रमाणात आला होता. त्यादरम्यानच्या काळात सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार सिंचनासाठी त्या अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत जादा पाणीवापर झाला आहे.
सध्या धरणातील एकूण शिल्लक पाणीसाठा लक्षात घेऊन पश्चिमेकडील वीजनिर्मिती तर बंदच ठेवण्यात आली आहे. याशिवाय सिंचनाचे पाणीही काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे होते. या दरम्यान पाटण -कराड ते सांगलीपर्यंत नदीकाठचा परिसर पूर्णपणे कोरडा पडल्याने स्थानिक पिण्याच्या पाण्याच्या योजना धोक्यात आल्याने सातत्याने सांगली पाटबंधारे विभागाकडून मागणी झाल्यानंतर बुधवारपासून कोयना धरण पायथा वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १०५० क्युसेक पाणी पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आल्याने स्थानिकांना सार्वत्रिक दिलासा मिळाला आहे.
सध्या घराण्यात उपलब्ध १५.५६ टीएमसी पैकी उपयुक्त १०.४४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. केवळ सिंचनाची गरज लक्षात घेतली तर अजूनही दोन महिने पुरेल इतका सिंचनासाठीचा पाणीसाठा धरणात शिल्लक असल्याची समाधानकारक बाब आहे. निश्चितच आता मान्सूनपूर्व असो अथवा मान्सूनचा पाऊस हा कोयना व निम्म्याहून अधिक महाराष्ट्रासाठी तितकाच गरजेचा आहे.