

सातारा : राजधानी सातार्यातील पुरातन कोटेश्वर मंदिराची थोरले शाहू महाराज यांच्या काळात उभारणी झाली. या मंदिर परिसरातील पारावर शके 1779 सालचा म्हणजे सन 1855 काळातील एक शिलालेख आढळून आला आहे. या शिलालेखावरील मजकूर देवनागरी लिपीत असून हा ऐतिहासिक ठेवा नुकताच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आला.
सातारा शहराला ऐतिहासिक वारसा आहे. याचाच एक भाग म्हणजे कोटेश्वर मंदिर आहे. थोरले शाहू महाराज यांनी सातारा शहराची 1721 साली स्थापना केली. थोरले शाहू महाराज यांच्या कार्यकाळात या मंदिराची उभारणी झाली. सध्या जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेतले असून त्याकाळात केलेले बांधकाम आजही तग धरून आहे. दर्शनी भागात एका पारावर देवनागरी लिपीतील शिलालेख इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे यांनी द़ृष्टिक्षेपात आणला. दोन फूट रुंदी व एक फूट उंचीचा हा शिलालेख शके 1779 म्हणजे 1855 सालातील आहे. अनिल दुधाणे यांनी या शिलालेखाचे वाचन करून याची माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांना दिली.
कोटेश्वर मंदिर परिसरात आढळलेला शिलालेखची दोन फूट रुंदी व एक फूट उंची आहे. यावर श्रीमद. कोटेश्वर चरणी तत्पर...मध्ये परोपकारे कनिष्ठ मा. अर्थसहाय्य, करून बाळाजी लक्ष्मण सुभेदार मेजर याणी, पार करविला. शके 1779 पिंगळ, नाम सवतसरे वैशाख वद्य 9 सौम्यवासरे, असा शब्दप्रयोग असल्याचा उल्लेख आहे.