

औंध : महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच औंंध येेथील ऐतिहासिक, पुरातन काळ्या पाषाणातील राजवाड्यासमोरील एकाहत्तर फूूट उंच दीपमाळ आज शनिवार दि. 3 जानेवारी रोजी प्रज्वलित केली जाणार आहे.
मागील अनेक दशकांपासून औंधची दीपमाळ प्रतिवर्षी पौष शाकंभरी पौर्णिमेला प्रज्वलित केली जात आहे. ही दीपमाळ कारागिरांमार्फत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उभी करण्यात आली होती. या दीपमाळेची रचना अतिशय देखणी व कल्पकतेने करण्यात आली आहे. पाच स्तरांमध्ये उभी असलेली ही दीपमाळ मोठ्या दिमाखात उभी आहे.
मागील काही वर्षांमध्ये या दीपमाळेच्या वरील बाजूकडील कमळ कुंडाखाली असणारे दगड, पायटे निसटू लागले होते. काही ठिकाणी वीज पडल्याने चिरण्याही गेल्या होत्या. औंध राजघराणे, ग्रामस्थ, भाविकांचे अतूट नाते या दीपमाळेशी असल्याने तसेच प्रतिवर्षी शाकंभरी पौर्णिमेला या दीपमाळेचे नेत्रदीपक दीपप्रज्वलन पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देशाच्या विविध भागातून भाविक हजारोंच्या संख्येने येत असल्याने तसेच देवीवरील श्रद्धेपोटी दीपप्रज्वलनासाठी तेल व ज्वालाग्राही पदार्थ अर्पण करत असतात. त्यामुळे मागील अनेक दशकांपासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा अखंडीतपणे सुरू रहावी यासाठी श्रीयमाईदेवी देवस्थानच्या चीफ ट्रस्टी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दीपमाळ दुरुस्तीचा निर्णय घेतला व ते काम जलदगतीने पूर्ण करण्यात आले.
श्रीयमाईदेवी देवस्थानच्या चीफ ट्रस्टी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील ठेकेदाराने पंचवीस राजस्थानी कारागिरांमार्फत अतिशय सुबकपणे व देखणे केले आहे. यासाठी कोल्हापूर येथील जोतिबा डोंगर तसेच औंध परिसरातील डोंगरातून नैसर्गिकरित्या काळ्या पाषाणातील हिरा समजला जाणारा कारी प्रकारचा दगड वापरून दीपमाळेचे काम पूर्ण केले आहे. ही दीपमाळ फार पुरातन आहे. दीपमाळ व वरील कमळ कुंडाचे काम पूर्ण झाले आहे. दीपमाळेचे काम पूर्ण झाले असून वरील कमळकुंडास सोनेरी रंग देण्यात आला आहे. वीजेपासून दीपमाळेचे संरक्षण व्हावे म्हणून तडितवाहक व सुमारे बहात्तर फूट लांब तांब्याची तार ही दीपमाळेवर बसवण्यात आली आहे. सध्या दीपमाळ परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.