

लोणंद : हिंगणगाव (ता. फलटण) गावच्या हद्दीत खानविलकर फार्म जवळ असलेल्या हिंगणगाव-आदर्की रस्त्याखालून जाणाऱ्या कॅनॉलच्या पाण्याच्या पोटपाटातील सिमेंट पाईपमध्ये अडकून बुडाल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. हे तीन मजूर ओडिशा राज्यातील असून या घटनेची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ज्योर्तिमय भगिरथी नाईक (वय 22), सतिन बिरची नाईक (35) आणि श्रीराम जगाई हेबरंम (20, सर्व रा. ओडिशा) अशी पाईपमध्ये गुदमरून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेही लोणंदमधील प्रीमियम चीक फीड या कंपनीत मजूर म्हणून काम करत होते. सध्या ते सूळ वस्ती, हिंगणगाव येथे राहात होते. तर ते मूळचे ओडिशातील असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणगाव येथील सूळ वस्ती परिसरातील पोल्ट्री फार्मवर काम करणारे हे मजूर जवळच असलेल्या खानविलकर फार्म हाऊसजवळील हिंगणगाव-आदर्की रस्त्याखाली जाणाऱ्या धोम-बलकवडी कालव्याच्या पोटपाटातील पाण्याकडे गेले होते. त्यावेळी सिमेंटच्या पाईपमध्ये पाणी भरलेले असताना ते त्यात अडकून बुडाल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोनवरून मिळाली.
माहिती मिळताच कंपनीचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाईपच्या एका बाजूला पाण्यात ज्योर्तिमय भगिरथी नाईक हा मजूर निपचित अवस्थेत पडलेला दिसून आला. याबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, कंपनीतील आणखी दोन मजूर कामावर न आल्याचे लक्षात आल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने पाईपमधील पाण्याचा प्रवाह दुसऱ्या दिशेने वळवण्यात आला. त्यानंतर सिमेंट पाईपमध्ये पाहणी केली असता सतिन नाईक आणि श्रीराम हेबरंम हे दोघेही पाईपमध्ये अडकलेले आढळून आले. त्यांना बाहेर काढून लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिघांचाही मृत्यू झाला होता. याबाबतची फिर्याद शाम बाळू भगत (वय 39, रा. सुळवस्ती, हिंगणगाव, ता. फलटण, मूळ रा. अमरावती) यांनी दिली असून लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.