सातारा शहरातील एका अल्पवयीन मुलीने गोंदवले येथे युवकाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुलीवर रविवारी संगम माहुली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात नातेवाईक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मुलीला न्याय मिळावा, यासाठी पोवई नाका येथे रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पोवई नाका येथे येऊन नातेवाईकांची भेट घेत कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. गोंदवले, ता. माण येथे अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी घडला. आत्महत्या केलेल्या या अल्पवयीन मुलीला सातार्यातील संशयित तस्लीम खान हा वारंवार त्रास देत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे.
या कुटुंबाच्या मदतीसाठी रविवारी सातार्यात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर आल्या. संबंधित मुलीवर रविवारी सातार्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या आई व नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. हिंदूत्वादी संघटनांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी रविवारी सकाळी 8 वाजता पीडित मुलीच्या घरी धाव घेतली. पोलिसही दाखल झाले होते. पीडित मुलीच्या घरापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर माहुली येथे सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर नातेवाईक, कुटुंबीय व हिंदुत्त्ववादी संघटनांनी पोवई नाका येथे रस्त्यावरच ठाण मांडत एक तास रास्ता रोको केला. वातावरण तणावपूर्ण होताच पोवईनाक्यावर पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला. एसपी समीर शेख स्वत: घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकर्त्यांची समजूत काढली.
याप्रकरणावरून सातार्यात तणाव निर्माण झाला होता. पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे कुटुंबिय, नातेवाईक यांची पोलिस मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत नातेवाईकांनी संंबंधित संशयिताला कठोर शिक्षा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा पवित्रा घेतला. त्यावेळी एसपी समीर शेख यांनी तपासातील तांत्रिक मुद्दे सांगून संशयिताला कठोरात कठोर शासन होण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.