Hindkesari wrestling tournament: ‘हिंदकेसरी‌’चा शड्डू आजपासून घुमणार

देशातील नामवंत मल्ल साताऱ्यात दाखल : शाहू स्टेडियमवर थरार
Hindkesari wrestling tournament: ‘हिंदकेसरी‌’चा शड्डू आजपासून घुमणार
Published on
Updated on

सातारा : कुस्ती महर्षी पै. साहेबराव पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठान सातारा व तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने छत्रपती शाहू स्टेडियम येथे 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. हिंदकेसरी स्पर्धेसाठी देशातील नामवंत मल्ल दाखल झाले असून, त्यांचा शड्डू आजपासून घुमणार आहे.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर साताऱ्यात हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा होत आहे. यात देशातील 28 राज्यांसह रेल्वे, सेनादल, वायूदल, भूदल अशा 8 सेवासंस्थांमधून सुमारे 600 पुरुष व 300 महिला सहभागी झाल्या आहेत. गुरुवार दि. 14 ते रविवार दि. 17 दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. गुरुवार दि. 14 मे रोजी सकाळपासून आलेल्या मल्लांची वजने करण्यात येत होती.

शुक्रवार दि. 15 रोजी सकाळी 7 ते 10 प्रथम सत्र होणार असून, यात देशभरातून आलेल्या मल्लांचा शड्डू घुमणार आहे. यासाठी मातीचे तीन आखाडे करण्यात आले असून, यात दिग्गज पैलवानांचे डाव-प्रतिडाव कुस्ती शौकिनांना पाहता येणार आहेत. तर सायंकाळी 6 वाजता स्पर्धेचे उद्घाटन किर्गीस्तानच्या माजी पंतप्रधान व जागतिक कुस्ती महासंघाच्या अध्यक्षा सुलतान बेकोवा, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

हिंदकेसरी विजेत्यास थार व चांदीची गदा, द्वितीय क्रमांकास ट्रॅक्टर, तृतीय क्रमांकास बुलेट तर चौथ्या क्रमांकास मोटारसायकल. वजन गट पुरुष 55 ते 85 किलो गटातील प्रत्येक प्रथम क्रमांकास मोटारसायकल, द्वितीय 50 हजार रुपये, तृतीय 20 हजार रुपये, चतुर्थ 20 हजार रुपये देण्यात येणार आहेत. हिंदकेसरी महिला 65 ते 90 किलो गटातील प्रथम क्रमांकास कार, द्वितीय स्कूटर, तृतीय 50 हजार रुपये, चतुर्थ 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत. महिला वजन गट 48, 52, 56, 62 किलो गटांतील प्रथम क्रमांकास स्कूटर, द्वितीय 50 हजार रुपये, तृतीय 20 हजार रुपये, चतुर्थ 20 हजार रुपये अशी एकूण सुमारे 5 कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक दीपक पवार व सुधीर पवार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news