

कराड : हिंदकेसरी संतोष वेताळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पक्षाच्या बाहुतील बळ वाढले आहे. क्रीडा क्षेत्राबद्दल त्यांच्या मनातील तळमळ पाहता भविष्यात खेळाडूंच्या हितासाठी पैलवान संतोष वेताळ यांच्यावर राज्यस्तरावरील मोठी जबाबदारी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ठाणे येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिंदकेसरी संतोष वेताळ यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खा.धैर्यशील माने, आ.सुहास बाबर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, अभिनेत्री दिपालीताई सय्यद, उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, रणजित पाटील, शिवसेनेचे सरचिटणीस राम रेपाळे, सुनील मोरे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख नगरसेवक शरद कणसे, कुस्तीसम्राट अस्लम काझी, गौरव नायकवडी उपस्थित होते.
संतोष वेताळ यांचेसह सुर्लीचे उपसरपंच कृष्णात मदने, अमोल भोगे, सुनील पाटील यांच्यासह हजारो पैलवानांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुस्ती हा मराठमोळा मर्दानी खेळ आहे. महाराष्ट्राचे हे वैभव जपलं पाहिजे. संतोष वेताळ सातारा जिल्ह्यातील पहिले हिंदकेसरी झाले, हा सातारकरांसाठी मोठा अभिमान आहे. चंद्रहार पाटील, संतोष वेताळ तुम्ही आता शिवसेनेच्या खर्या आखाड्यात आला आहात. सातारा, सांगली जिल्ह्यापुरते मर्यादित राहून चालणार नाही. महाराष्ट्रातील तालमींच्या, पैलवानांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा. शिवसेनेची ताकद तुमच्या मागे उभी करु.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, कुस्तीसारख्या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी शिवसेनेने मदत करावी हा उदात्त हेतूने चंद्रहार पाटील, संतोष वेताळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. यावेळी आ. सुहास बाबर, चंद्रहार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.