

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. १२ जागांसाठी २०२१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा बँकेसाठी दिग्गज २४ उमेदवारांचे भविष्य आज मतपेटीबंद होणार असून मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महायुती म्हणून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. बँकेसाठी चर्चेतून ९ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर सर्वच सोसायटी मतदारसंघांमध्ये घमासान रंगणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी ठरावधारकांचे मेळावेही घेतले आहेत. प्रचार संपल्यानंतर रविवारी धुमशान रंगणार आहे. जिल्हा बँकेसाठी सातारा, जावली, महाबळेश्वर, कराड, पाटण, कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण, वाई आणि फलटण या ११ तालुक्यांमध्ये मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
यामध्ये शासकीय तांत्रिक विद्यालय, सातारा, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, मेढा, शेठ गंगाधर माखरिया हायस्कूल, महाबळेश्वर, शिवाजी हायस्कूल आवार, आदर्श प्राथमिक शाळा, कराड, कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल, पाटण, कांतिलाल विरचंद भंडारी प्राथमिक विद्यालय, कोरेगाव, हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, दहिवडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खंडाळा, जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई, श्रीमंत राणीसाहेब सौ. लक्ष्मीदेवी मालोजीराव ना. नाईक निंबाळकर नगरपरिषद शाळा क्रमांक ८, फलटण या ११ केंद्रांवर मतदान होणार आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने ११५ अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या परिसरात जमावबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. सर्व मतदान केंद्रे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहेत.
मतदानासाठी ओळखपत्र बंधनकारक
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दि. १ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार मतदानासाठी मतदारांना छायाचित्र असलेले ओळखपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी विविध १४ प्रकारच्या ओळखपत्रांना मान्यता देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, केंद्र किंवा राज्य शासनाच्या कार्यालयाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक अथवा पोस्ट ऑफिसचे छायाचित्र असलेले पासबुक यांसह अन्य मान्यताप्राप्त कागदपत्रे सादर करता येणार आहेत. यामध्ये आधारकार्ड, छायाचित्र असलेले रेशनकार्ड, निवृत्तीवेतनधारकांचे पासबुक, मनरेगा जॉबकार्ड, अपंगत्वाचे प्रमाणपत्र आदींचाही समावेश आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी जाताना आवश्यक ओळखपत्र सोबत ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदीचे आदेश
जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी दि. १२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र बंदी व जमावबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जमावबंदी व शस्त्रबंदी काळात शास्त्र, तलवारी, भाले, बंदुका, सुर्या, काठ्या किंवा शारिरीक इजा करणारी कोणतीही वस्तू सोबत नेणे, फटाके वगळता इतर दाहक पदार्थ बाळगणे, दगड किंवा अस्त्र, फेकायचे हत्यार बाळगण्यास मनाई आहे. सार्वजनिक घोषणा, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे इत्यादी प्रकारे शांतता धोक्यात येईल असे कृत्य करण्यास मनाई आहे. यात्रा, धार्मिक कार्य, लग्न, विधी कार्य तसेच अंत्यविधी कार्यास हा आदेश लागू राहणार नाही. फटाक्यांबाबत परवाना आवश्यक आहे. शांततेत एकत्र जमून कार्यक्रम करण्यासाठी पालिसांची लेखी पूर्व परवानगी आवश्यक असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी नागेश पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.