

सातारा : लहान मुलांवर होणार्या अत्याचारांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि त्यांना एक सुरक्षित माध्यम उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शिक्षण विभागाने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या नव्या शैक्षणिक वर्षापासून, इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ’चाईल्ड हेल्पलाईन 1098’ या क्रमांकाचा समावेश करण्यात आला आहे.
अनेकदा मुले भीतीमुळे किंवा काय करावे हे न समजल्यामुळे अत्याचाराची माहिती कोणालाही देऊ शकत नाहीत. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हा हेल्पलाईन क्रमांक तिसरीच्या पुस्तकात होता, मात्र आता लहान वयातच मुलांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तो पहिलीच्या अभ्यासक्रमात आणला गेला आहे. या उपक्रमाचा मुख्य हेतू मुलांना ‘गुड टच आणि बॅड टच’ यातील फरक समजावून देणे हा आहे.
संकटकाळात सापडल्यास 1098 या क्रमांकावर संपर्क साधताच प्रशिक्षित समुपदेशक मुलांशी संवाद साधून त्यांना तातडीने मदत करतील. यामुळे मुलांमध्ये मदत मागण्याचे धाडस निर्माण होईल आणि आपण सुरक्षित आहोत, ही भावना वाढीस लागेल. यासोबतच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी पाठ्यपुस्तकात वाहतुकीचे नियम, झेब्रा क्रॉसिंग आणि हेल्मेट वापरासारख्या महत्त्वाच्या बाबींचाही समावेश करण्यात आला आहे. शिक्षण विभागाचा हा निर्णय मुलांसाठी एक मोठा आधार ठरणार आहे.
जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा व्यक्ती 1098 वर कॉल करते, तेव्हा प्रशिक्षीत अधिकारी तो फोन उचलतात. विशेष म्हणजे, बालकांची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. गरज भासल्यास, प्रशिक्षित तज्ञांकडून तात्काळ मदत पोहोचवली जाते. ज्यात मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर मदतीचा समावेश असतो.