

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढला असून, डोंगरदऱ्यामध्ये रिपरिप कायम आहे. महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड, पाटण तालुक्यांमध्ये गुरुवारी सरीवर सरी कोसळल्या. या पावसाने ठोसेघर धबधबा फेसाळला आहे. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमधील धबधबेही प्रवाहित होऊ लागल्याने परिसर हिरवाईने नटू लागला आहे. वेधशाळेने ५ जुलैपर्यंत जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात ऑरेंज तर रविवारी रेड अलर्ट दिला आहे.
जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून पावसाने पुनरागमन केले आहे. रात्री पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. मात्र, गुरुवारी सकाळपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने जाेर धरला आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवेत गारठाही निर्माण झाला होता. डोंगरदऱ्यामध्ये धुक्यासह पावसाची रिपरिप कायम होती. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. ठोसेघर धबधब्यामध्ये पाण्याचा प्रवाह वाढत चालला असल्याने धबधबा फेसाळू लागला आहे.
सातारा शहर व परिसरात गुरुवारी दिवसभर पावसाच्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून, अनेक ठिकाणी धूळवाफेवर झालेल्या पेरण्यांना दिलासा मिळाला आहे. तर काही ठिकाणी पेरणी झालेली पिके उगवू लागली आहेत. तर काही ठिकाणी पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.यंदा पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यास आडसाली उसाच्या लागणीही रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम भागात पडत असलेल्या पावसामुळे भाताचे तरवे चांगलेच फुलले असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, भात लागणीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत झालेला पाऊस असा, सातारा ७.९ मि.मी., जावली २३ मि.मी., पाटण १९.८ मि.मी., कराड १०.७ मि.मी., कोरेगाव ४.६ मि.मी., खटाव ३.८ मि.मी., माण ०.५ मि.मी., फलटण ३.८ मि.मी., खंडाळा ४.९ मि.मी., वाई १५.३ मि.मी., महाबळेश्वर १४१.५ मि.मी. पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत झालेला पाऊस असा, सातारा ७.९ मि.मी., जावली २३ मि.मी., पाटण १९.८ मि.मी., कराड १०.७ मि.मी., कोरेगाव ४.६ मि.मी., खटाव ३.८ मि.मी., माण ०.५ मि.मी., फलटण ३.८ मि.मी., खंडाळा ४.९ मि.मी., वाई १५.३ मि.मी., महाबळेश्वर १४१.५ मि.मी. पावसाची नोंद झाली.