माणवासीयांच्या घशाला आणखी कोरड

water crisis: तालुक्यातील तलावांमध्ये अवघा 15 टक्के पाणीसाठा
water crisis
माण तालुक्यातील ब्रिटिशकालीन पिंगळी तलावामध्ये सध्या 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. pudhari photo
Published on
Updated on

शिखर शिंगणापूर : गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. दुष्काळी समजल्या जाणार्‍या माण तालुक्यातील प्रमुख तलावांच्या पाणीसाठ्यात ऐन उन्हाळ्यात लक्षणीय घट झाली आहे. तालुक्यातील दहा मध्यम व लघु प्रकल्पांपैकी सहा तलावांत केवळ 14.93 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर लोधवडे, जाशी, महाबळेश्वरवाडी व मासाळवाडी हे चार तलाव सध्या कोरडे ठणठणीत पडल्याचे दहिवडी येथील पाटबंधारे उपविभागीय कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

जिहे कठापूरचे पाणी आंधळी धरणातून माणगंगेत सोडल्याने दिलासा मिळाला असला, तरी तालुक्यातील काही गावांमध्ये टँकर सुरू असल्याने टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. माण तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 450 मिलीमीटर असून गेल्या काही वर्षांत तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने विहिरींसह मध्यम व लघु प्रकल्प तुडुंब भरले होते. परंतु, यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने तालुक्याच्या काही भागांत टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यातच यावर्षीच्या उन्हाळ्याने गेल्या शतकातील उष्णेतेचे रेकॉर्ड मोडल्याने माणमधील पाराही 40 अंशापर्यंत चढला आहे.

तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पपांतर्गत असलेल्या दहा तलावांतील एकूण पाणीसाठवण क्षमता 29.87 दशलक्ष घनमीटर आहे. यापैकी पिंगळी, आंधळी, राणंद, ढाकणी, जांभुळणी, गंगोती या सहा तलावामध्ये 4.46 दशलक्ष घनमीटर म्हणजेच केवळ 14.93 टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये ब्रिटिशकालीन पिंगळी तलावात सर्वात जास्त म्हणजे 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

तालुक्यातील प्रमुख जलस्त्रोत असलेल्या आंधळी धरणात जिहे कठापूर योजनेचे पाणी सोडल्याने प्रतिवर्षीच्या तुलनेत आंधळी धरणक्षेत्रात अधिक पाणीसाठा उपलब्ध असून सध्या आंधळी धरणात 26 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. जांभुळणी तलावात केवळ 25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर ढाकणी तलावात 28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

गंगोती तलावात 5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर राणंद तलावात केवळ 2.5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उष्णतेच्या तीव्रतेने उपलब्ध पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने तलावातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली असून लोधवडे, जाशी, महाबळेश्वरवाडी व मासाळवाडी हे चार तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. तालुक्यातील काही गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून सध्या तालुक्यातील 30 हून अधिक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. तसेच लहान-मोठे तलाव, बंधारे, विहिरींच्या पाणीसाठ्यातही घट झाल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news