

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेतला आहे का? नाही याची पडताळणी करण्यासाठी पंचायत समित्यांचे तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यशासनाने सुरु केली आहे. मात्र या योजनेचा लाभ काही सरकारी महिला कर्मचार्यांनी घेतल्याची बाब निदर्शनास आली आहे. पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र कार्यालयातील काही महिला कर्मचारी सुध्दा या योजनेचा लाभ घेत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने आपल्या कार्यालयातील सर्व महिला कर्मचार्यांचे या योजनेंतर्गत मिळणार्या लाभामध्ये कोणताही सहभाग आहे अगर कसे? याबाबतचे लेखी पत्र सर्व कार्यालय प्रमुखांनी तालुका आरोग्य अधिकार्यांना व तालुका आरोग्य अधिकार्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती सादर करावी.
तथापी एखादा कर्मचारी सरकारी सेवेत दाखल होण्यापूर्वी या योजनेमध्ये सहभागी झाला असेल व योजनेचा लाभ घेत असेल, अशा कर्मचार्यांने सरकारी सेवेत दाखल झालेल्या दिनांकापासून या योजनेतून प्राप्त केलेले अनुदान शासनास परत करण्याचे प्रयोजन आहे. तरी अशा कर्मचार्यांची माहिती कार्यालयास सादर करुन लाभार्थी कर्मचार्यांनी त्याचे नाव या योजनेतून तत्काळ मागे घेवून लाभ थांबवण्याबाबत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सातारा यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिल्या आहेत.