आघाडीमुळे काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान : हर्षवर्धन सपकाळ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेतृत्वाला अधिकार
Congress State President
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळPudhari Photo
Published on
Updated on

कराड : गतकाळात आघाडी आणि युतीची अपरिहार्यता होती. आघाडी आणि युतीमध्ये काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देश व महाराष्ट्र पातळीवरही आघाडीमुळे काँग्रेसचे नुकसान झाल्याचे सांगत भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आघाडी करायची की स्वतंत्रपणे निवडणूक लढायची याबाबतचा निर्णय स्थानिक नेतृत्वाने घ्यावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, आघाडीमुळे काँग्रेसचे नुकसान झाले असले तरी भविष्यात काँग्रेसची वैचारिक लढाई सुरूच राहणार आहे. काँग्रेस पक्षाच्या पुनर्बांधणीचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे लवकरच मोठे बदल झालेले दिसून येतील. भविष्यात काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल घडून येतील. सर्व समावेशक व पारदर्शक पद्धतीने आवश्यक ते बदल केले जाणार आहेत.

सध्या देशावर संकटाचे सावट आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी भारतीय सैन्य व सरकारच्या बरोबर राहिले पाहिजे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र वेगळे राज्य आहेत. परंतु सध्या महाराष्ट्र धर्म धोक्यात आहे. विचार, आचार, व्यवहार आणि उच्चार कसा ठेवावा याची आठवण स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर नतमस्तक होताना झाली. त्याच सोबत राज्यकर्त्यांनी आपली वाणी, आपले वक्तव्य कशी ठेवली पाहिजेत याचाही आदर्श स्व. यशवंतराव चव्हाण यांना घालून दिला होता. काँग्रेस पक्षाने पुढे जात असताना महाराष्ट्र धर्माची सभ्यता, संस्कृती, राजकारणाची दिशा कशी असावी याचा संकल्प केला आहे. दुसरीकडे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला हा आपला इतिहास आहे. त्याचे स्मरणही आज येथे झाले. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तुत्वाला साक्षी ठेवून प्रत्येक भारतीय नागरिकांनी सैन्य दलाच्या पाठीशी राहिले पाहिजे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आघाडी करायची की स्वतंत्रपणे लढायचे याबाबतचा निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार स्थानिक नेतृत्वाला देण्यात आले आहेत. काँग्रेसमुक्त भारत ही भाजपाची आजपर्यंतची भूमिका राहिली आहे. परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की काँग्रेस मुक्त भारत कधीही होऊ शकत नाही. उलट बीजेपी हा पक्ष काँग्रेस युक्त झाला आहे. काँग्रेस पक्षाला इतके सोडून गेले तरी काँग्रेस संपलेली नाही आणि संपणारही नाही. काही अडचणींमुळे नेते इकडून तिकडे जात असतील पण पक्षाचा कार्यकर्ता हा नेहमी काँग्रेस बरोबरच राहिला आहे.

भाजपाची संविधान बदलण्याची भूमिका किंवा तसा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे संविधानाचे रक्षण करणारा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे आजही काँग्रेस विरुद्ध भाजपा हीच खरी लढाई आहे. या लढाईत जनता काँग्रेस सोबत राहिलेली आहे. काँग्रेस पक्ष कधीही बुडणार नाही. कारण भारताचा डीएनए आणि काँग्रेसचा डीएनए एकच आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी जे जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन काँग्रेस पक्ष पुढे जाणार आहे.

हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच कार्यकर्त्यांची उपस्थिती

देशात मोठा पक्ष म्हणून गणलेल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असल्याचे दिसून आले. पक्षाचे प्रमुख नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पूर्वनियोजित दौर्‍यामुळे बाहेरगावी होते. तर कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे हेही घरगुती कामानिमित्त परगावी गेले होते. मात्र शहर, तालुका व जिल्हातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळेला गैरहजर राहिल्याचे दिसून आले. एका मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दौर्‍यावर येत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेहमी मागे-पुढे करणार्‍यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. याची चर्चा मात्र शहरासह तालुक्यात सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news