

शिरवळ : शिरवळ पोलिसांनी शिरवळ येथील स्टार सिटी अपार्टमेंटमधील गाळ्यात छापा टाकून धडक कारवाई केली. या कारवाईत गुटखा, पान मसाला, गुटखा बनवण्याचे मशिन, त्यासाठी लागणारी सुपारी, पावडर, पॅकिंग साहित्य, चारचाकी वाहन असा एकूण 1 कोटी 6 लाख 19 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे.
सुनील पुतन सिंह, राहुल हरिलाल देपन (वय 24), कन्हैयालाल काळूराम गेहलोत (वय 30) व पुष्पेंद्र अकबाल सिंह (वय 28, सर्व रा. पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. स्वप्निल नामदेव देवकर (रा. चोरीमळा, ता. जुन्नर, जि. पुणे) व अन्य तीन अशा एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिरवळचे पोनि यशवंत नलावडे यांना शिरवळमध्ये गुटखा घेऊन जाण्यासाठी वाहन आल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी कर्मचार्यांना या ठिकाणी छापा टाकण्याच्या सूचना केल्या. यावरून अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी व पोलिस कर्मचार्यांनी स्टारसिटी अपार्टमेंटमध्ये छापा टाकत गुटखा रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये 83 लाख 19 हजार 270 रुपयांचा गुटखा पान मसाला, गुटखा बनवण्याचे मशीन व लागणारे सुपारी, पावडर, पॅकिंग साहित्य व आवश्यक मशीन असा 18 लाख 50 हजार रुपये व साडे चार लाखांचे वाहनअसा एकूण 1 कोटी 6 लाख 19 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईनंतर पोलिसांनी दोन गाळे सील केले आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत पोनि यशवंत नलवडे, सपोनि महादेव शिद, पोलीस अंमलदार शशिकांत भगत, धरमसिंग पावरा, सुधाकर सूर्यवंशी, तुषार कुंभार, सचिन वीर, सुरज चव्हाण, अरविंद बार्हाळे, भाऊसाहेब दिघे, दीपक पालेपवाड, तुषार अभंग, अजित बोराटे, सुधाकर सपकाळ व अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे, अधिकारी वंदना रुपनवर, इम्रान हवालदार, प्रियंका वाईकर यांचे सहकार्य लाभले.
शिरवळमधील स्टार सिटीसारखा गजबजलेला गृह प्रकल्प परिसर हा या ना त्या कारणाने प्रसिद्ध आहे. वेश्या व्यवसाय, गँगवार, अवैध धंदे करणार्यांचा अड्डा बनला आहे, अशी चर्चा परिसरात आहे. परिसरामध्ये गुटखा कारखाना दिवसाढवळ्या इतक्या दिवसांपासून सुरू असूनही आजपर्यंत याबाबतची माहिती कोणालाच कळाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दिवसाढवळ्या हा कारखाना सुरू राहण्यासाठी कोणाचा वरदहस्त आहे? यामागचे खरे सूत्रधार समोर येणार का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.