

सातारा : सातारा शहराजवळ वाढे फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) बंदूक व काडतूस पकडत तिघांवर कारवाई केली. यामध्ये संशयित आरोपींच्या बाबतीत मात्र गोलमाल झाला असून, प्रेसनोटमध्ये दोघे, परत तिघे, एफआयआरमध्ये चौघांची नावे आहेत. याशिवाय आणखी एकाला सोडले असल्याची चर्चा आहे. सोडून दिलेला संशयित युवक सरपंचाचा मुलगा असून, त्याबाबत बराच ‘खल’ झाला आहे.
ओम बापूराव महानवर (वय 20, रा. साखरवाडी), श्रेयस ऊर्फ मॉन्टी शरद खताळ (वय 19, रा. कापडगाव दोन्ही ता.फलटण), आकाश संतोष नरुटे (वय 21), तात्या उर्फ सुयश सोमनाथ घोडके (वय 23, दोघे रा. कळंब ता.इंदापूर जि.सोलापूर) यांच्यावर आर्म अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या कारवाईत पिस्टल, एक काडतूस, मोबाईल व दुचाकी असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी, एलसीबीच्या पथकाने मंगळवारी ही कारवाई केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी दि. 15 जुलै रोजी त्यांना दोन युवक पिस्टल विक्री करण्यासाठी वाढे फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबी पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले. पोलिस दबा धरुन बसले असताना त्यांना दोन संशयित दिसले व त्या दोघांसोबत दुचाकीवर आणखी एकजण होता.
पोलिसांनी त्यांना थांबवले असता त्यांनी त्यांची नावे ओम महानवर, श्रेयस खताळ, आकाश नरुटे अशी सांगितले. यातील ओम याच्या कंबरेला पिस्टल तर खिशामध्ये एक जिवंत काडतूस होते. पोलिसांनी तिघांकडे चौकशी केल्यानंतर आकाश नरुटे याने ते पिस्टल तात्या उर्फ सुयश घोडके याच्याकडून 30 हजार रुपयांना विकत घेवून ते आम्ही विक्री करण्यासाठी आणले असल्याचे सांगितले. पोलिसांनी पिस्टल, जिवंत काडतुस, मोबाईल, दुचाकी जप्त केले. याप्रकरणी एलसीबी पोलिसाने स्वत: तक्रार केली आहे.
एलसीबी पोलिसांची मंगळवारी दुपारी ही कारवाई झाली आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी घटनास्थळी अनेकांची धरपकड केली. संशयित सुरुवातीला माहिती देत नसल्याने ‘पोलिसी खाक्या’ दाखवण्यात आला. बारकी पोरं, मालदार पार्टी ओळखून फोनाफोनी झाली. सुमारे 2 तास खल झाल्यानंतर एकाला सोडून देण्यात आले. सर्व प्रकरणानंतर तक्रार फायनल करायचे झाल्यानंतर एलसीबीच्यावतीने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
त्यानंतर एलसीबीने बुधवारी बंदूक बाबत प्रेसनोट जारी केली. यामध्ये दोनच संशयित आरोपींची नावे होती. याबाबत अधिक माहिती घेण्यास सुरुवात झाल्यानंतर सांयकाळी तिघांवर गुन्हा दाखल असल्याचे सांगत प्रेसनोटमध्ये एक नाव वाढवण्यात आले. एफआयआर बाबत माहिती घेतली असता त्यामध्ये मात्र चौघांवर गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. यामुळे एकाचे नाव का लपवण्यात आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बंदुकीच्या कारवाईतील संशयितांच्या नावाबाबत व संख्याबाबत अधिक माहिती घेतली असता, एक अशी माहिती समोर आली आहे की, घटनास्थळी आणखी एकाला ताब्यात घेतले होते; मात्र तो संशयित मित्रासोबत आला होता. त्याला यातले काहीच माहीत नव्हते. तो लहान होता. त्याचे करिअर विचारात घेऊन त्याला सोडून दिले. बंदुकीसारखे प्रकरण गंभीर आहे. एरवी पोलिस बारका असला तरी विधीसंघर्ष बालक ताब्यात, अशी कारवाई करतातही. यामध्ये संशयित मुलगा अल्पवयीन नसून, तो सज्ञान आहे. मात्र, काथ्याकूट केल्यानंतर त्याला सेफ ठेवल्याची चर्चा आहे.