Grandparents Literacy Program | नातवाच्या वर्गात आजी-आजोबांची शाळा
सातारा : नवभारत साक्षरता अभियानांतर्गत जिल्ह्यातील आजी-आजोबांची रविवारी शाळा भरली. आता ज्या वर्गात नातू अभ्यासाचे धडे गिरवतोय त्याच वर्गात आजी-आजोबांनी परीक्षा दिली. दरम्यान, रविवार दि. 21 सप्टेंबर रोजी विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. दरम्यान, शिरवळ, शिंदेवाडी येथील केंद्रांना शिक्षण संचालक महेश पालकर यांनी भेटी देवून आजी-आजोबांशी संवाद साधला.
केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी सातारा जिल्ह्यातील असाक्षर व्यक्तींसाठी विविध परीक्षा केंद्रावर सकाळी 10 ते 5 यावेळेत परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी 16 हजार 740 असाक्षरांची नोंदणी झाली होती. शिक्षणाला वयोमर्यादा नसते असे म्हटले जाते. आता याची प्रचिती सातारा जिल्ह्यात रविवारी पहावयास मिळाली. सातारा जिल्ह्यात 15 हजार 851 हजार असाक्षर आजी-आजोबांनी परीक्षा दिली. सुट्टीच्या दिवशी आजी-आजोबांनी शाळा भरलेल्या दिसून आल्या. सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा अनोखा उपक्रम दिसून आला.
खंडाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिरवळ मुले व मुली, जि. प. शाळा शिंदेवाडी, शिंदेवाडी माध्यमिक विद्यालय या केंद्रांना माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी गजानन आडे यांनी भेटी दिल्या. यावेळी महेश पालकर यांनी आजी-आजोबांशी संवाद साधला. परीक्षेस आलेल्या असाक्षरांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. परीक्षा नियोजनाबाबत महेश पालकर यांनी समाधान व्यक्त केले. शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी कराड तालुक्यातील वाठार, कार्वे मुली या शाळांना भेटी दिल्या.

