

कोरेगाव : भाजपचे जिल्हाध्यक्ष व आ. अतुलबाबांनी सातार्यातील ऐतिहासिक शाही दसर्याला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आम्ही काम करतो. महाराष्ट्राच्या मातीत छत्रपतींच्या आदेशाचा अवमान केला जाणार नाही. हिंदू संस्कृती पाळणारे सण व उत्सवांना प्रोत्साहन देणे ही आमची जबाबादारी आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या आदेशाचे शासन पालन करेल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने - कदम, ‘दोन तास समाजासाठी महिला ग्रुप’ यांच्या वतीने आयोजित महिला कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आ. अतुल भोसले, आ. मनोजदादा घोरपडे, चित्रलेखा माने, पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अमरसिंह जाधवराव, सुरभी भोसले, प्रियंका कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. शेलार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना सक्षम केले आहे. विरोधक ‘लाडकी बहीण योजना’ बंद पडणार असा अपप्रचार करत आहेत पण मी वचन देतो ही योजना बंद पडणार नाही. उलट यामध्ये अधिक वाढ होईल. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. चित्रलेखाताई यांची समाजसेवा व महिलांचे संघटन उत्तम आहे. आ. अतुल भोसले यांनी सातार्यातील ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याची मागणी केली. आ. मनोज घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
चित्रलेखा माने म्हणाल्या, महाराणी जमनाबाई गायकवाड या रहिमतपूरच्या सरदार माने घराण्यातील माहेरवाशीण आहेत. त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. या मातेने बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांना घडविले. अशा कर्तृत्ववान महाराणींचे स्मारक येथील महिलांसाठी प्रेरणास्थान बनावे कार्यक्रमासाठी सुनेषा शहा, दैवशीला मोहिते, अश्विनी हुबळीकर, निशा जाधव, वैष्णवी कदम, वैशाली टंकसाळे, वैशाली मांढरे, माजी नगराध्यक्ष संपतराव माने यांच्यासह महिला उपस्थित होत्या.